एक कोटीच्या नोटा प्रकरणात 'ईडी'ला औरंगाबाद पोलिस पाठवणार पत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

औरंगाबाद - हजार, पाचशेच्या जुन्या नोटांच्या गौडबंगाल प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय "ईडी'ला औरंगाबाद पोलिस पत्र पाठवणार आहेत. या पैशांचा मालक कोण, पैशांची प्राप्ती कशी झाली, यासंबंधीची माहितीही मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

औरंगाबाद - हजार, पाचशेच्या जुन्या नोटांच्या गौडबंगाल प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय "ईडी'ला औरंगाबाद पोलिस पत्र पाठवणार आहेत. या पैशांचा मालक कोण, पैशांची प्राप्ती कशी झाली, यासंबंधीची माहितीही मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

एक कोटीच्या नोटा प्रकरणात पोलिस कसोशीने तपास करीत आहेत. चकलांबा येथे पकडलेल्या साडेनऊ लाखांच्या नोटानंतर पोलिस कर्मचारी वीरबहादूर गुरुंग ऊर्फ थापा याचे नाव समोर आले. त्याचा मोठा सहभाग असल्याने या प्रकरणात पोलिसांवरही संशयाचे सावट निर्माण झाले. त्यामुळे चकलांबा ठाण्याचे निरीक्षक तेजनकर यांना विचारपूस करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले. गुरुवारी (ता. नऊ) त्यांची चौकशी पूर्ण झाली. नोटा पकडण्याच्या कारवाईचे त्यांनी छायाचित्रण केले होते. आवश्‍यक ती कारवाई त्यांनी केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

या प्रकरणातील फिर्यादी राजेश ठक्कर यांनी सांगितले, की एक कोटीच्या नोटा हितेश पुजारा या व्यक्तीने आपणास बदलण्यासाठी दिल्या. पण त्यानंतर नोटांची चौघांकडून लूट झाली. नोटा मुळात कुणाच्या असा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणात हितेश पुजारांच्या चौकशीनंतरच नोटांचे गौडबंगाल उघड होणार आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला या प्रकरणात चौकशी करण्यासाठी विनंती केली आहे. या पैशांचे उत्पन्न, बेहिशेबी मालमत्ता आहे का? याचा शोध प्राप्तिकर विभागाकडून घेतला जाईल.

नोटांचा मालक कोण आहे, यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आम्ही "ईडी'ला पत्र पाठवत आहोत. "ईडी'ने या प्रकरणाची चौकशी करावी. त्यांनी या प्रकरणात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांचे काम सोयिस्कर होऊन तपासाला गती मिळेल.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त.

Web Title: police letter to idi in currency case