भाजपला अच्छे, तर शिवसेनेला 'बुरे दिन' 

Shiv Sena
Shiv Sena

कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेची शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड सुरु झाली आहे. गटातटाचे राजकारण, अंतर्गत कलह आणि एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी यामुळे शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली आहे. एकीकडे शिवसेनेचे बोट धरून चालायला शिकलेली भाजप आज शिवसेनेच्या पुढे पळायला लागली आहे. लोकसभा वगळता विधानसभा, महापालिका व नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजप वरचढ ठरली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपला अच्छे तर शिवसेनेला बुरे दिन आले आहेत. 

शिवसेनेचे पतन... 
औरंगाबाद लोकसभेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी ही जागा कायम राखली. अर्थात युतीचा त्यांना फायदा व्हायचा. लोकसभा, विधानसभेप्रमाणेच महापालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता अबाधित आहे. महापालिकेत कायम शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही भाजपपेक्षा दुप्पट, तिप्पट असायची. आता ही परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या एक आकडी नगरसेवकांची संख्या 2014 नंतर 23 वर पोचली आहे. आजच्या घडीला महापालिकेत शिवसेनेचे 28 तर भाजपचे 23 नगरसेवक आहेत. एकीकडे शिवसेनेला ओहोटी लागल्याचे, तर भाजपला भरती आल्याचे चित्र आहे. शहरातील पूर्व, पश्‍चिम, व मध्य या तीन मतदारसंघात स्वतंत्रपणे लढल्यानंतर पूर्व मधून भाजपचे अतुल सावे, पश्‍चिम-संजय सिरसाट विजयी झाले, तर मध्यची जागा 'एमआयएम'ने पटकावली. युती तुटल्याने हिंदू मतांमध्ये फुट पडली, तर 'एमआयएम'मुळे मुस्लिम एकवटले. पूर्वची जागा 'एमआयएम'ने थोडक्‍यात गमावली, तर मध्य मध्ये फाटाफुटीचा लाभ त्यांना मिळाला. तत्पुर्वी, जिल्हा परिषदेची सत्ता युतीने अंतर्गत वादावादीमुळे गमावली होती. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुल्ताबाद नगरपालिकेतही शिवसेनेचा सफाया झाला होता. नुकत्याच झालेल्या चार नगरपालिका निवडणुकीत पैठण व गंगापूरमध्ये भाजपची सत्ता आली. गंगापूरात युती तर पैठणमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर नगरपालिका राखली, तर पैठणमध्ये आमदार संदीपान भुमरे यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. 

युध्दात जिंकली तहात हरली 
भाजपने चाणक्‍य नितीचा वापर करत डावपेच आखले आणि त्यात शिवसेना अलगद अडकली. पैठण नगराध्यपदावरुन युती फिसकटल्यानंतर भाजपने नगराध्यक्षपदासाठी जोर लावला. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक पैठणमध्ये निवडून आले, पण नगराध्यक्ष भाजपचा झाला. त्यामुळे सत्तेची चावी भाजपच्या हाती गेली. गंगापुरात नेमके उलटे घडले. इथेही शिवसेनेचे राजकारण कमी पडले. गंगापुरात युती झाली, नगराध्यक्षपदी भाजपच्या वंदना पाटील विजयी झाल्या. मात्र गंगापुरात देखील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिली. याचाच अर्थ शिवसेनेची ताकद असूनही केवळ युती करतांना योग्य निर्णय न घेतल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. त्यामुळे दोन नगराध्यक्षांसह भाजपने मुंसडी मारली तर नगरसेवकांची संख्या अधिक असूनही शिवसेनेचा प्रभाव कमी झाला. भाजप उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्री प्रचाराला आले, तर शिवसेनेने स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांच्या भरवशावरच निवडणुका लढवल्या. मुंबईहून शिवसेनेचा एकही मोठा नेता औरंगाबादच काय पण राज्यात प्रचारासाठी कुठेच फिरकला नाही, त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत, धान्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. गावागावात मदत पोहचवली, पण सेनेच्या या समाजकार्यावर भाजपची निती भारी ठरली. 

भाजपचा सेनेला दम 
नगरपालिका निवडणुकीत पहिल्या क्रमाकांचा पक्ष ठरल्यानंतर भाजपचा तोरा वाढला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत आम्हाला युती हवी आहे असा राग भाजपने आळवायला सुरुवात केली असली तरी विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे शिवसेनेला सावध पावले उचलावी लागतील. जानेवारी-फेब्रुवारी 2017 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व 62 गटांच्या निवडणुकीची तयारी करा, अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. याचाच अर्थ भाजप जिल्हा परिषद निवडणूका स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेशी युती करणार का? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर जाधव यांनी दिलेल्या उत्तरावरुन भाजप युती करण्याच्या मुडमध्ये नसल्याचे संकेत मिळत आहेत. युती होईल पण जुन्या समीकरणांनुसार नाही, तर भाजपच्या वाढलेल्या ताकदीनुसारच बोलणी करावी लागेल. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, पण आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे सांगत जाधव यांनी शिवसेनेला इशाराच दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com