टपालाच्या तक्रारींचा चोवीस तासांत निपटारा

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - काम अधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने "1924‘ ही देशव्यापी नवी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कामकाजाच्या दिवशी ही हेल्पलाईन सकाळी आठ ते सायंकाळी आठदरम्यान कार्यरत राहणार असून तक्रारींचा 24 तासांत निपटारा करण्याचा प्रयत्न याद्वारे होईल. 

औरंगाबाद - काम अधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने "1924‘ ही देशव्यापी नवी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कामकाजाच्या दिवशी ही हेल्पलाईन सकाळी आठ ते सायंकाळी आठदरम्यान कार्यरत राहणार असून तक्रारींचा 24 तासांत निपटारा करण्याचा प्रयत्न याद्वारे होईल. 

टपालाची सेवा घेणाऱ्यांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या या अडचणी आणि तक्रारी आता हेल्पलाईनच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचविता येतील. "1924‘ या हेल्पलाईनच्या माध्यमातून देशभरातून ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार असून त्यांचा निपटाराही चोवीस तासांत करण्यासाठी टपाल विभाग आग्रही राहील. हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये ही ग्राहक सेवा सुरू केली असून लवकरच अन्य भाषांमध्येही या सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. देशातील कोणतीही मोबाईल सेवा घेणाऱ्यांना या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली तक्रार देता येईल. ही हेल्पलाईन सुरू करण्यापूर्वी पोस्टाच्या वतीने ट्‌विटर हॅंडलच्या माध्यमातून तक्रारी करणे आता ग्राहकांना शक्‍य होत आहे. या माध्यमातूनही रोज तक्रारींचे "शतक‘ होत आहे.
 

विभागीय कार्यालयांमधून निरीक्षण
टपाल विभागाच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आपल्या हद्दीतील तक्रारींच्या निपटाऱ्याची देखरेख करण्यात येणार आहे. या कामासाठी नेमण्यात आलेला विभागीय कार्यालयातील अधिकारी आपल्या हद्दीतील तक्रारींचा दररोज आढावा घेईल आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलेल.
 

अशी चालणार यंत्रणा
- ग्राहकाने "1924‘ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार कामकाजाच्या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी आठदरम्यान नोंदवावी.
- संगणकीकृत ग्राहक केंद्रावर फोनवरून तक्रार नोंदवल्यावर त्या ग्राहकाला "अकरा अंकी तिकीट क्रमांक‘ मिळेल.
- तक्रार आधी दिली असेल तर वेब पोर्टलवर त्या तक्रारीसंबंधीची माहिती अपलोड करण्यात येईल. शिवाय ग्राहकाला त्या तक्रारीच्या निवारणाचा तपशीलही मिळेल.
- तक्रार नोंदवताच त्याची माहितीही संबंधित टपाल कार्यालयाला जाईल आणि तेथून कारवाई होईल.

धोरणात्मक विषय असेल तर...
धोरणात्मक विषयासंबंधी तक्रार आली तर त्याचा लगेच निपटारा करण्यात आला नाही तर संबंधित ग्राहकाला त्याची माहिती देण्यात येईल. या तक्रारींना प्रतिसाद मात्र चोवीस तासांत देण्यात येणार आहे. अशा तक्रारींचा संचालनालयातील पोस्टमास्टर आठवड्याला आढावा घेतील.