पोस्टमनही होणार आता "स्मार्ट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

औरंगाबाद, जालन्यात देणार अँड्रॉईड फोन; रजिस्टर, स्पीड मिळताच होणार नोंद

औरंगाबाद, जालन्यात देणार अँड्रॉईड फोन; रजिस्टर, स्पीड मिळताच होणार नोंद
औरंगाबाद - ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी भारतीय टपाल खाते आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करत आहे. त्या अनुषंगाने पोस्टमनला "मोबाईल ऍप्लिकेशन' दिले जाणार आहे. याची सुरवात औरंगाबाद विभागात 12 मेपासून होणार आहे. सुरवातीला औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील 157 पोस्टमनला स्मार्टफोनसह हे ऍप्लिकेशन दिले जाणार आहे.

रजिस्टर, स्पीड पोस्ट, पार्सल मिळाल्यानंतर यामध्ये लगेचच ग्राहक मोबाईलवरच आपली सही करेल. शिवाय त्याची नोंद लोकेशनसह पोस्टाच्या वेबसाईटवर होणार आहे. परिणामी, आता येत्या काळात पोस्टमनसुद्धा स्मार्ट होणार आहेत. औरंगाबाद विभागात रोज 15 हजार 800 स्पीड पोस्ट, पाच हजार 300 रजिस्टर पोस्ट; तर पार्सल 1300 पर्यंत जातात. यामध्ये पोस्टमन हे साहित्याची यादी सोबत घेऊन ते ग्राहकांना पोचते करीत होते. त्यानंतर रात्री येऊन संकेतस्थळावर त्याची नोंद केली जात होती. मात्र, आता यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न केला जात असून, औरंगाबादेत पथदर्शी प्रकल्प म्हणून 157 पोस्टमनला स्मार्ट फोनसह "पोस्टमन मोबाईल ऍप्लिकेशन' दिले जाणार आहे.

पोस्टमन हा ग्राहकाकडे पोस्ट घेऊन गेल्यानंतर त्याला मोबाईलवरच त्याची सही घ्यावी लागेल. त्यानंतर "ओके'वर क्‍लिक केल्यानंतर त्याची नोंद टपालाच्या संकेतस्थळावर होणार आहे. त्यामुळे वेळेत बचत होईलच, शिवाय ग्राहकाला चांगली सुविधा मिळेल. विशेष म्हणजे यामध्ये पोस्टमनचे "लोकेशन'सुद्धा कळणार आहे. टपाल विभाग पोस्टमनला स्मार्ट फोन, सिम कार्ड उपलब्ध करून देणार आहे. देशाचा विचार केला तर वर्ष 2015-16 या वर्षामध्ये 14.43 कोटी स्पीड पोस्ट; तर 16.91 कोटी रजिस्टर पोस्ट करण्यात आले होते.

पोस्टाने सुरू केले ऍप
टपाल विभागाने ग्राहकांना माहिती, सुविधा देण्यासाठी "पोस्ट इन्फो' ऍप सुरू केले आहे. हे ऍप सर्वांना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करता येऊ शकतो. यामध्ये माहितीसह तक्रार नोंदविण्याची सुविधासुद्धा देण्यात आली आहे.

टपालाच्या माध्यमातून ग्राहकांना आम्ही चांगल्या दर्जाच्या सुविधा देत आहोत. आता पथदर्शी प्रकल्प म्हणून पोस्टमन यांना मोबाईल ऍप्लिकेशन दिले जात आहे. यातून "पेपरलेस' काम तर होईल, शिवाय डिजिटल इंडियाकडे वाटचाल करण्याससुद्धा एकप्रकारे मदत मिळेल.
- प्रणव कुमार, पोस्टमास्टर जनरल, औरंगाबाद विभाग.

Web Title: postman smart