स्वार्थासाठी भाऊ, पत्नी, मुलालाही दिला धोका

बीड - शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश सोळंके व अमरसिंह पंडित.
बीड - शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश सोळंके व अमरसिंह पंडित.

प्रकाश सोळंकेंची सुरेश धसांवर टीका
बीड - सुरेश धसांच्या पत्नी संगीता धस यांच्या पराभवासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेच रसद पुरविली, स्वार्थासाठी धसांनी भाऊ, पत्नी व मुलालाही धोका दिल्याची टीका माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी शुक्रवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत केली.

श्री. सोळंके म्हणाले, की स्वतःचा विश्वासघातकीपणा झाकण्यासाठी त्यांना समाज आणि प्रस्थापित -विस्थापित मराठा आठवला. पण, पक्षाने त्यांना महानंदचे अध्यक्षपद, मंत्रिपद, पक्षाचे स्टार प्रचारक केले तेव्हा ते विस्थापित मराठे नव्हते का, माझे मंत्रिपद काढून त्यांना दिले, त्या वेळी विस्थापित आणि प्रस्थापित मराठे आठवले नाहीत का ? असा सवाल करून आम्ही राजकीय कुटुंबात जन्मलो, यात आमचा काय दोष? पण, सुरेश धस हे लुटण्याचा वसा चालवतात.

संगीता धस यांच्या पराभवासाठी सुरेश धस यांच्या दुसऱ्या पत्नीने रसद पुरवली, थोरल्या बायकोचा मुलगा राजकारणात येऊ नये; यासाठी खेळी खेळली, स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठीच धस राष्ट्रवादीत आले.

आता पुन्हा त्यासाठीच भाजपसोबत गेले, उलट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी असलेले अध्यक्षपद त्यांनी इतर मागासवर्गीय महिलेला दिल्याने मराठा समाजात रोष असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले. जिल्हा परिषदेच्या सत्तांतरात सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केला, त्यांना यासाठी किती रुपये, कुठे, कसे मिळाले याचीही आपल्याला माहिती आहे, असे प्रकाश सोळंके म्हणाले. विजयसिंह पंडित यांना अध्यक्ष करण्यासाठीही धसांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्याचे अमरसिंह पंडित यांनी एका गीताच्या (कसं कसं सांगू, काय मी केलं, कसं मी केल, कुठं मी केलं) माध्यमातून सांगितले.

आमदार अमरसिंह पंडित म्हणाले, की धोकेबाजी हा धसांचा स्वभाव आहे. धसांना पालकमंत्री करण्यासाठी आम्हीच पक्षाला विनंती केली. अब्दुल्लांच्या अध्यक्षपदासाठी आम्हीच धसांसोबत होतो, तेव्हा आम्ही कानफुके नव्हतो का, त्यांना आजच गरीब मराठा कसा आठवला ? असा सवाल श्री. पंडित यांनी केला.

धर्मेंद्र अन्‌ "आखरी रास्ता'मधील सदाशिव अमरापूरकर
राष्ट्रवादीतून निलंबनानंतर कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश धसांनी प्रकाश सोळंकेंचा "बप्पी लहरी' तर अमरसिंह पंडित यांचा "सरकटे बंधू' असा उल्लेख केला होता. याला सोळंके व पंडित यांनी उत्तर दिले. सोळंके म्हणाले, ""धसांना कोणती उपमा द्यावी, असा प्रश्न पडला होता. पण, त्यांना धर्मेंद्र हे नाव शोभते; कारण "मैं तेरा खून पी जाऊंगा' हा धर्मेंद्रचा नेहमीचा संवाद असून दोघांनाही दोन बायका आहेत.'' अमरसिंह पंडित म्हणाले, ""धस हे "आखरी रास्ता' चित्रपटातील "सदाशिव अमरापूरकर' शोभतात.''

टीकेला खुले उत्तर देणार - धस
प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. राजकीय भांडणात कौटुंबिक विषय काढल्याने मला वेदना झाल्या. पण, मी त्यांच्या टीकेला लवकरच खुले उत्तर देईन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com