`स्पेशालीस्ट`च्या पदवीतच `स्पेशल` घोटाळा !

degree
degree

लातूर : शंभर वर्षापेक्षा जुना स्वायत इतिहास असलेल्या मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशिअन अॅँड सर्जन (सीपीएस) संस्थेने घेतलेल्या परीक्षांमध्ये काहीजण प्रत्यक्ष नापास झाले. पण पॅक्टिससाठी परवाना आवश्यक असलेल्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे बनावट पदविका आणि गुणपत्रक सादर करून नोंदणी केलेल्या अठरा डॉक्टरांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तर असा संशय असलेल्या दीडशेपेक्षा अधिक `स्पेशालीस्ट` डॉक्टरांची कसून चौकशी सुरु आहे. 

याबाबत महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे मराठवाड्यातील एकमेव सदस्य डॉ. संजय कदम म्हणाले, ``चार-पाच वर्षांपूर्वी काही  डॉक्टरांनी पदव्युत्तर पदविका आणि फेलोशीपसाठी प्रवेश घेतला मात्र ते दोन-तीन वर्षानंतरही या पदविका परीक्षेत पास झाले नाहीत. मात्र त्यांनी आमच्याकडे वैदक परिषदेकडे बनावट प्रमाणपत्र सादर करून परवाना मिळविला. हे लक्षात आल्यानंतर त्यांचे परवाने आम्ही निलंबीत केले आहेत.``

एमबीबीएस पदवी मिळविल्यानंतर प्रत्येक जण पुढे स्पेशालिस्टची पदवी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र त्याची प्रवेश परीक्षाच खूप अवघड असल्यामुळे काहीजण सीपीएस संस्थेची पदविका किंवा फेलोशीप मिळवितात. या सीपीएस संस्थेत प्रवेशही `सरळ` होतो आणि परीक्षाही याच संस्थेकडून घेतली जाते. ही संस्था 1912पासून संपूर्णतः स्वायत आहे. या संस्थेची पदविका ही शासकीय वैद्यकीय पदव्युत्तर पदवीशी समकक्ष मानली जाते. ही सीपीएस संस्था विविध विषयांमध्ये दोन वर्षाचे तब्बल 41 कोर्सेस तर तीन वर्षांचे दहा फेलोशीपच्या माध्यमातून परीक्षेनंतर प्रमाणपत्र देते. सध्या देशातील केवळ पाच राज्यामध्ये या मुंबईस्थित संस्थेच्या पदविकांना मान्यता मिळालेली आहे. यात शल्यविशारद, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोगतज्ज्ञ आदी विषयांना अधिक मागणी असते. 

यात कारवाईची टांगती तलवार असलेल्या एक `तज्ज्ञ` डॉक्टर (नाव न सांगण्याच्या अटीवर) म्हणाले की आम्ही शेकडो डॉक्टर हे करोडो रुपयांचे व्यवहार असलेल्या एका सुनियोजित रॅकेटचे शिकार झालेलो आहोत. या संस्थेत प्रवेश घेतल्यापासून मध्यस्थ व्यक्ती विषयानुसार विद्यार्थ्यांच्या संपर्कात असते. अगदी परीक्षेच्या दिवशीही त्यांच्याकडून संपर्क साधला जातो. एवढेच नाही निकालाच्या काही दिवस अगोदर जवळजवळ प्रत्येकाला तो भेटून निकाल नकारात्मक असल्याचे सांगतो. मात्र यात आपण फेरफार करून उत्तीर्णचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही देऊ शकतो, पण त्यासाठी अगदी दहा-बारा लाखांपर्यंत मागणी होते. अशा रॅकेटचा अनुभव आलेले मराठवाड्यात तर शेकडो स्पेशालिस्ट आहेत. तर अनेकावर सध्या टांगती तलवार आहे. 

सीपीएस ही स्वायत संस्था
कॉलेज ऑफ फिजिशिअन अॅँड सर्जन (सीपीएस) ही संस्था मुंबईत 1912मध्ये इंग्रज अधिकारी सर्जन जनरल सर एच. स्टिव्हन्सन यांनी सुरु केली. भारतीय जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासोबतच विषय तज्ज्ञांची फळी उभी राहावी, या हेतूने ही संस्था सुरु झाली असून सुमारे 108 वर्षांपासून ही संस्था संपूर्णतः स्वायतपणे कार्यरत आहे. या संस्थेची पदविका ही पदव्युत्तर पदवीशी (एमडी) समकक्ष मानली जाते. मात्र प्रॅक्टिस परवाना मिळविण्यासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे (एमएमसी) शैक्षणिक कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी लागते. त्यानंतर या कागदपत्रांची सत्यता पडताळली जाते. 

दोषींवर कारवाई करूच!
सीपीएस संस्थेची पदविकेची परीक्षा उत्तीर्ण नसतानाही बनावट कागदपत्रे आढळलेल्या अठरा डॉक्टरांवर कारवाई केली आहेच. पण या प्रकरणाची व्याप्ती शोधण्यासाठी आणखी काही जणांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू, असे डॉ. संजय साहेबराव कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com