औरंगाबादेमध्ये दानवे यांच्या प्रतिमेला चपला, बुटांचे फटके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

तुरखरेदीच्या मुद्दावरुन शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला आज (शनिवार) कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चपला, बुटांचे फटके मारत संताप व्यक्‍त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दानवेंसह सरकारच्या धोरणाचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबाद - तुरखरेदीच्या मुद्दावरुन शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला आज (शनिवार) कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चपला, बुटांचे फटके मारत संताप व्यक्‍त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दानवेंसह सरकारच्या धोरणाचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात दानवे यांनी शेतकऱ्यांना "साले' असे संबोधले होते. त्या वक्‍तव्याचे पडसाद त्यांच्या गावासह संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसतर्फे रिक्षाला लाऊड स्पीकर लावून दानवेंच्या वक्‍तव्याचा समाचार घेण्यात आला. "रावसाहेब दानवे हाय काय', "रावसाहेब दानवे होश मे आओ, होश मे आके बात करो', "दानवेंचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय', "मस्तवाल भाजपा सरकार हाय हाय', "हुकुमशाही नही चलेगी', अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दानवेंची प्रतिमा लावलेला पुतळा आंदोलनात आणत त्याला लाथा, बुक्‍या मारल्या. हे करीत असतानाच फोटोमध्ये आपण दिसावे, यासाठी कार्यकर्त्यांच्या दोन गटात धक्‍काबुक्‍कीही झाली. धक्‍काबुक्‍की करणाऱ्यांना बाजूला केल्यानंतर समोरील काही कार्यकर्त्यांनी दानवेचे छायाचित्र काढून त्याचे लचके तोडले. त्यानंतर मागील बाजूला असलेल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सरोज मसलगे पाटील यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारले. तसेच शेतकऱ्यांबद्दल वापरलेले शब्द आपल्यालाच साभार परत करीत आहोत, असे म्हणत शेतकऱ्यांना कर्जमाफी, उत्पादन खर्चावर 50 टक्‍के नफा देणारा हमीभाव, शेतमालाला शासकीय खरेदीची तरतुद सरकारमार्फत करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, केशवराव औताडे, डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई उकर्डे, मनोज शेजुळ, नगरसेवक सोहेल शकील शेख, भाऊसाहेब जगताप, मोहन साळवे, इब्राहिम पटेल, रमजानी खान, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, अतिश पितळे, खालेद पठाण, संजय औताडे, नगरसेविका सायली जमादार, किशोर बलांडे, बाबा तायडे, अनिल माळोदे, काकासाहेब कोळगे, अथर शेख, अजय डिडोरे, महिला आघाडीच्या सरोज मसलगे, सरोज नवपुते, अनिता भंडारी, अर्चना मुंदडा, संगिता कांबळे, मृणाल देशपांडे, रेखा जैस्वाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी होते.