तूर खरेदीत कमी पडलो -  गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली औरंगाबादेत सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. साठवणुकीच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आम्ही तुरीच्या साठवणुकीची क्षमता तिपटीने वाढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद - शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली औरंगाबादेत सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. साठवणुकीच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आम्ही तुरीच्या साठवणुकीची क्षमता तिपटीने वाढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

वाढवून दिलेली मुदत संपल्यानंतर तूर खरेदी बंद झाली आहे. याविरोधात राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून तूर जाळण्याचेदेखील प्रयत्न झालेत. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी तूर खरेदीच्या नियोजनासंदर्भात केलेले वक्‍तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बापट म्हणाले, ""मागणीच्या तुलनेत देशात 35 टक्‍के तुरीचे उत्पादन होत आले. मागणीनुसार उत्पादन होत नसल्याने आपण आफ्रिकी देशांकडून तुरीची खरेदी करत होतो. यंदा मात्र महाराष्ट्रातच 28 ते 29 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे.'' 

शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन व्यापारीच खरेदी केंद्रांवर तूर आणून विकत असल्याच्या प्रश्‍नाकडे बापट यांचे लक्ष वेधले असता अशा अनेक तक्रारी येत असल्याचे मान्य केले. भंडारा जिल्ह्यात तसे प्रकार आढळून आले आहेत. असे प्रकार उघडकीस येताच संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तूर खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येणाऱ्यांकडे कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जेवढा पेरा असेल त्याच प्रमाणात तूर खरेदी केली जाईल. 

भविष्यात गोदामांअभावी शेतकऱ्यांचा माल खरेदी करता आला नाही, असे होऊ नये म्हणून राज्य सरकार तीनशेहून अधिक गोदामे बांधणार आहे. 22 मेपर्यंत तूर खरेदीची टोकन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. त्या सर्वांची तूर खरेदी केली जाईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

दूध तपासणीसाठी फिरती प्रयोगशाळा 
""दूध तपासणीसाठी राज्यात लवकरच फिरती दुग्ध तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल. याआधी सरकारकडून तसा प्रयत्न केला गेला; परंतु आता पुन्हा दुधातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. दुधाच्या कोणत्याही वाहनाला कुठेही थांबवून या प्रयोगशाळेत त्याची तपासणी करणार आहे,'' अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली. औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित 66 तक्रारींची सुनावणी घेतली.