मृत राहुल कांबळे यांच्या मुलाला पोलिस दलात सामावून घेणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - आमखास मैदानावर बंदोबस्तावर असताना हृदयविकाराने मृत्यू झालेले पोलिस कर्मचारी राहुल कांबळे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी ध्वज अर्ध्यावर उतरवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. बुधवारी (ता. पाच) सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली.

औरंगाबाद - आमखास मैदानावर बंदोबस्तावर असताना हृदयविकाराने मृत्यू झालेले पोलिस कर्मचारी राहुल कांबळे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी ध्वज अर्ध्यावर उतरवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. बुधवारी (ता. पाच) सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईतील लोहमार्ग पोलिस विभागात राहुल कांबळे कार्यरत होते. त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी औरंगाबादेत बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी (ता. चार) न्याय्य मागण्यांसाठी विनाअनुदानित (कायम) संस्थेवर कार्यरत शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला, या वेळी आंदोलक व पोलिस यांच्यात धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी राहुल कांबळे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवला व काही वेळातच त्यांचे निधन झाले. यानंतर बुधवारी (ता. पाच) सकाळी अकरादरम्यान त्यांचे पार्थिव पोलिस आयुक्तालयात नेण्यात आले. तेथे पुष्पचक्र अर्पण करून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली; तसेच ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला. उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी व राजकीय नेते, पदाधिकारी मंडळींनी श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना करण्यात आले. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. कांबळे यांना मुलगा रोहित व दोन मुली असून, त्यातील एकीचे लग्न झाले आहे. या वेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती उपस्थित होते.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली, की राहुल कांबळे यांचा मुलगा रोहित याला पोलिस दलात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अनुकंपा तत्त्वावर त्याला पोलिस दलात सामावून घेतले जाईल. राहुल कांबळे यांच्या निधनानंतर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यादांच महासंचालकांनी कांबळे यांच्या सेवेच्या सन्मानार्थ व शोक पाळून औरंगाबाद शहर व मुंबई रेल्वे मुख्यालय येथे बुधवारी पोलिस ध्वज अर्ध्यावर उतरविला.

Web Title: rahul kamble son join in police team