सौरऊर्जेने राजाबाजार जैन मंदिर होणार स्वयंप्रकाशित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मराठवाड्यातील पहिले मंदिर असल्याचा विश्‍वस्तांचा दावा
अभिजित हिरप

मराठवाड्यातील पहिले मंदिर असल्याचा विश्‍वस्तांचा दावा
अभिजित हिरप
औरंगाबाद - औरंगाबादमधील सकल जैन समाजातर्फे यंदा स्वच्छ, सुंदर आणि हिरवे शहराचा संदेश देण्यासाठी राजाबाजार येथील श्री खंडेलवाल दिगंबर जैन पार्श्‍वनाथ मंदिरात सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. भगवान महावीर जयंतीनिमित्त आर्यिका ज्ञानमती माताजींच्या हस्ते रविवारी (ता. नऊ) सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन होईल.

सध्या निर्मिती होणाऱ्या विजेची बचत करून सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर केल्यास राष्ट्रीय संपत्ती असलेली वीज वाचविणे शक्‍य होईल. त्यामुळे महावीर जयंतीदिनी महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लि.च्या परवानगीने दहा किलोवॉट इतकी वीजनिर्मितीची क्षमता असलेले सौर पॅनेल सुमारे एक हजार चौरस फूट जागेवर बसविण्यात आले आहे. यातून निर्माण झालेली वीज महावितरणच्या ग्रीडशी जोडली जाईल. तेथून ही वीज मंदिरातील सभागृह, खोल्या, गाभारा आणि परिसरात वापरले जाणारे लाईट, पंखे, वातानुकूलित यंत्रणा आणि पाण्याच्या मोटारीसाठी वापरली जाणार आहे.

सध्या मंदिराच्या एकूण विजेच्या वापरापोटी अंदाजे तीस हजार रुपये मासिक बिल येते. पुढील महिन्यापासून विजेची बचत तथा सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज वापरून अंदाजे वीस हजार रुपयांपर्यंत बचत होणे अपेक्षित आहे. दिवसेंदिवस विजेची निर्मिती आणि वापरात ताळमेळ बसल्यास त्यातून मंदिरासाठी आर्थिक उत्पन्नही मिळू शकेल.

टप्प्याटप्प्याने पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांत सौरऊर्जा वापरली जाईल, असा आशावाद विश्‍वस्तांनी व्यक्‍त केला. राजाबाजार जैन मंदिरात सौर प्रकल्प उभारणीसाठी पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, नितीन बोरा, विनोद लोहाडे, आनंद मिश्रीकोटकर, दर्शन संचेती, सुनील सेठी, मुकेश ठोळे, एम. आर. बडजाते यांच्यासह विश्‍वस्त व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

सौरऊर्जा निर्मितीसाठी सहकार्य
राजाबाजार येथील जैन मंदिरामध्ये बसविण्यात आलेले सौरऊर्जेचे पॅनेल हे जैन इंजिनिअरिंग सोसायटीच्या मदतीने बसविण्यात आले आहेत. याबाबत "जेसा'चे अध्यक्ष राजेश पाटणी म्हणाले, की सौरऊर्जा ही पर्यावरणपूरक असून, आर्थिक बचत करणारा पर्याय आहे. सामाजिक जबाबदारीतून हा प्रकल्प मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि मोठमोठ्या सोसायट्या यांच्यासाठी राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

दिवसेंदिवस विजेची तूट वाढत जात आहे. त्या तुलनेत निर्मिती करणे सरकारलाही अशक्‍य आहे. त्यावर तोडगा म्हणजे मुबलक प्रमाणात असलेल्या सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करणे. राजाबाजार जैन मंदिरात सौरऊर्जा प्रकल्प उभारून आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात मोठमोठ्या संस्थांनी सौरऊर्जेचा वापर केल्यास विजेची बचत होऊ शकेल. ही काळाची गरजही आहे. महावीर जयंतीनिमित्त पर्यावरण वाचविण्याचा आमचा हा लहानसा प्रयत्न आहे. यात अनेकांनी सहभागी व्हावे.
- ललित पाटणी, अध्यक्ष, जैन पंचायत, औरंगाबाद

Web Title: rajabajar jain temple on solar power