शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे- रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

तीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. हे आरक्षणाच्या विरोधात असल्याचा चुकीचा प्रचार आहे.

औरंगाबाद : शिवसेना भाजपने एकत्रच राहावे आणि शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

शहरामध्ये एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. तीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. हे आरक्षणाच्या विरोधात असल्याचा चुकीचा प्रचार आहे. ते आरक्षणाच्या बाजूने आहेत, त्यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातील अद्यायवत असे भव्यदिव्य स्मारक साकारत आहे, स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा बाबासाहेबांचा हा पुतळा उभा राहणार आहे. बाबासाहेबांचे जन्मस्थळ असलेले महू, लंडन येथील बाबासाहेब राहत असलेले घर, चैत्यभूमी, दिक्षाभुमी आणि दिल्ली येथील 26 अली रोडवरील बंगला अशी पंचतिर्थस्थळांच्या विकासाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असून, त्याच्या कामांना प्रारंभ झालेला आहे.

आरक्षण हे पन्नास टक्‍क्‍यापेक्षा अधिक जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेले आहेच. त्यामुळे उर्वरित पन्नास टक्‍क्‍यातून मराठा, मुस्लिम, जाट किंवा अन्य जातींना आरक्षण देण्यासाठी 25 टक्के आरक्षणाचा कायदा केला तर हा प्रश्‍नच संपुष्टात येईल अशी भूमिका आठवले यांनी मांडली. 25 टक्के आरक्षणाचा कायदा करुन क्रिमेलियरची अट घालून आरक्षण द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, शिवसेनेची आणि विरोधी पक्षाची भूमिका रास्त आहे, मात्र त्यासाठी लागणारे 30 ते 35 हजार कोटी रुपये कसे उभे करावेत हेही सांगितले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती करण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना सत्तेत राहून सत्ता विरोधी वक्तव्य करत आहे, शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे असा सल्ला त्यांनी दिला.