एवढी तूर खरेदी करूनही रडतात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

"केंद्र सरकारने मालाचे भाव ठरविले आहेत. जेथे कमी भाव दिला जात असल्याचे निदर्शनास आले तेथे सरकार बाजारात उतरून मालाची खरेदी करीत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. 31 मे 2017 पर्यंत तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली, या काळात एक लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे, तरी रडतात..

जालना - "राज्य सरकारने आतापर्यंत विक्रमी तूर खरेदी केली. 31 मेपर्यंत मुदतवाढ देऊन आणखी एक लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे. एवढी तूर खरेदी करूनही रडतात...' अशा असभ्य शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्याला झापले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांची जीभ पुन्हा घसरली.

राज्यात तूर खरेदीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. ती कधी विकली जाईल, चार पैसे कसे मिळतील, या आशेवर शेतकरी आहेत. शेतकरी कर्जमाफी, तूर प्रश्‍न आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांवरून शिवसेनेसह विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीच्या वाऱ्या करून तूर खरेदीचा प्रश्‍न कसा सोडविता येईल याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करताना दिसतात. नगर जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यात काल कर्जमाफीच्या मुद्यावरून वादग्रस्त विधान केल्यावर आज पुन्हा दानवे यांनी आपल्या कर्मभूमीत तोंडाचा दानपट्टा चालविला. त्यांचे हे बोल नवा वाद उभा करण्याची शक्‍यता आहे. कार्यक्रमानंतर लगेचच त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकास्त्र सुरू झाले आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयाचे उद्‌घाटन श्री. दानवे यांच्या हस्ते बुधवारी येथे झाले. त्या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद रंगला. एका कार्यकर्त्याने, "तुरीबाबात काय उत्तर द्यायचे' असा सवाल केला. त्यावर दानवे त्याला ठणकावत म्हणाले, "केंद्र सरकारने मालाचे भाव ठरविले आहेत. जेथे कमी भाव दिला जात असल्याचे निदर्शनास आले तेथे सरकार बाजारात उतरून मालाची खरेदी करीत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. 31 मे 2017 पर्यंत तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली, या काळात एक लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे, तरी रडतात...' तू जास्त पेपर वाचतो का? वाचत जाऊ नको, असे कार्यकर्त्याला सुनावत "आता तूर, कापूस खरेदीबाबत काहीही बोलणे बंद केले पाहिजे. यापुढे तुरीबाबत अजिबात रडायचे नाही, तर लढत राहायचे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्षासाठी निधी जमा करणार
पक्षासाठी राज्यभरातून निधी जमा केला जाणार असल्याचे स्पष्ट करून दानवे म्हणाले, की कार्यकर्त्यांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे. जालना जिल्ह्यातून सुमारे 25 लाख रुपयांचा निधी संकलित केला जाईल. तो निधी पक्षासाठी वापरला जाईल. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा राज्यासह देशातील विविध भागांत भेटी देणार असून, पक्षातर्फे लवकरच सात हजार किलोमीटर यात्रा काढणात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे श्री. लोणीकर म्हणाले. आमदार नारायण कुचे, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सगळ्यात जास्त अनुदान दिलं
स्वातंत्र्यापासूनच्या इतिहासात कधी दिले नाही एवढे चारशे रुपये अनुदान या सरकारनं दिल, तरीबी यंदाचं साल खराबच आहे, तुरीला भाव नाही असं रडगाणं गातात, मग आधीच्या सरकारन काय केलं? हा विषय बंद करा आणि भाजप सरकारने काय केलं ते लोकांना सांगा, असे आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Web Title: raosaheb danve criticizes farmers