दानवेंच्या घराबाहेर शेतकरीपुत्रांचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

आम्ही शेतकऱ्यांची मुले असून, दानवेंनी आमच्या शेतकरी पित्याचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून, ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.

जालना : शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागांतील तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानाबाहेर उपोषण सुरू केले आहे. 

उस्मानाबाद, नाशिक, परभणी व औरंगाबाद येथून आलेल्या काही तरुणांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अन्नाचा त्याग करीत उपोषण सुरू केले आहे. शेतमाल खरेदीच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसह संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव संताप व्यक्त करीत आहेत. 

'आम्ही शेतकऱ्यांची मुले असून, दानवेंनी आमच्या शेतकरी पित्याचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून, ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,' असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.