रेशनच्या तूरडाळीला मिळेनात ग्राहक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - खुल्या बाजारात तूरडाळ ९०-९५ रुपये किलो मिळू लागल्याने गोरगरीब कार्डधारकांसाठी रेशन दुकानावर शासनाने उपलब्ध करून दिलेल्या १०३ रुपये किलो मिळणाऱ्या तूरडाळीला ग्राहकीच नसल्याने रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. व्यापाऱ्यांनीही सरकारी दराने तूरडाळ विक्री करून एकप्रकारे सरकारचेच ग्राहक पळवले आहेत. 

काही महिन्यापूर्वी तूरडाळीचे भाव आकाशाला भिडले होते. एक किलो तूरडाळीसाठी नागरिकांना दीडशे ते पावणे दोनशे रुपये मोजावे लागले. यानंतर शासनाने १२० रुपये किलो दराने खुल्या बाजारात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. शासनाची तूरडाळ येणार, असे माहिती होताच व्यापाऱ्यांनीही त्यांचा नफा कमी केला. हळूहळू तूरडाळीचे भाव नियंत्रणात आले. शासनानेही १२० ऐवजी ९५ रुपये किलो दराने मॉलमध्ये तूरडाळ देण्याचे जाहीर केले. तर रेशन दुकानावर बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांसाठीही तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. मात्र मॉलपेक्षा रेशनच्या तूरडाळीचा दर १०३ रुपये प्रतिकिलो ठरवला. मॉलमध्ये स्वस्त तर रेशन दुकानावर महाग मिळणार तूरडाळ अशी चर्चाही नागरिकांमध्ये रंगली होती.

शिवाय मॉलमध्ये एका व्यक्‍तीला एक किलो डाळ मिळत आहे, त्यामुळे कार्डधारकांनीही मॉलमधील डाळीलाच पसंती दिली. एकीकडे अशी परिस्थिती असताना, रेशन दुकानावरील तूरडाळीचे भाव काही कमी केले नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांनी सावध भूमिका घेत सरकारी गोदामातून एक-दोन क्विंटल डाळच उचलली. आता ही डाळ दुकानातच पडून आहे. डाळ दुकानापर्यंत आणण्यासाठी प्रतिक्विंटल २५ रुपये ट्रान्सपोर्ट खर्च जास्तीचा करावा लागला आहे. कार्डधारकांकडून डाळीला मागणी नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून ही डाळ दुकानात पडून आहे.

जसजशी डाळ जुनी होईल, त्यातील ओल कमी होऊन डाळ वाळेल, परिणामी वजन कमी भरेल. शासनाला डाळ परत करताना प्रति क्विंटलमागे तीन-पाच किलोची घट होईल, त्याचा भुर्दंडही वेगळा पडणार असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे.