चिमणपाखरांसाठी मानवी संवेदनांचा आसरा...

अंबड - मत्स्योदरी महाविद्यालयात पशुपक्ष्यांसाठी झाडावर चारापाण्याची व्यवस्था करताना प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विश्‍वासराव कदम, प्रा. डॉ. शिवशंकर घुमरे.
अंबड - मत्स्योदरी महाविद्यालयात पशुपक्ष्यांसाठी झाडावर चारापाण्याची व्यवस्था करताना प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विश्‍वासराव कदम, प्रा. डॉ. शिवशंकर घुमरे.

औरंगाबाद - उन्हाळा सुरू होताच प्राणी, पक्षी सैरभैर होतात. शेत-शिवारांत पाणी नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. शहरांत माणसांची गर्दी असते पण पशुपक्ष्यांसाठी चारा नि पाण्याची सोय नसते. नेमकी हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न व्यक्ती व सामाजिक संघटना करत आहेत. अशा व्यक्ती, संस्थांनी चिमणपाखरांना आसरा देऊन माणुसकी जपली आहे.

घरात जणू पक्षी संग्रहालय!
लातूर शहरातील सय्यद महेबूब पाशा हे पेशाने वाहनचालक असून त्यांना पशुपक्ष्यांचा लळा लागला आहे. त्यांचे घर म्हणजे कबुतरखाना नव्हे तर पशू व पक्षी संग्रहालय आहे. त्यांच्याकडे कुत्री, मांजरांसह जवळपास शंभर चिमण्या, साळुंकी, खारूताई, कावळे, हंस, बदक, कबुतरे, ससे आहेत. त्यांचा कुटुंबातील सर्वांनाच लळा लागलेला आहे. या पक्ष्यांना अन्न भरवण्याचे काम कुटुंबातील महिलांसह सर्वजण करतात. पाशा यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या गायी, म्हशी, गाढवांसाठी घरासमोर खास पाणपोई बनविलेली आहे.

पाशा यांनी पक्ष्यांसाठी 15 बाय 40 फुटांचा प्लॉट राखून ठेवला आहे. त्यात अंजीर, चिकू, जांब, फणस, बदाम, सीताफळ, रामफळ, उंबर, पिंपळ, लिंब, गुलमोहर आदी झाडे लावली आहेत. त्याद्वारे पक्ष्यांना नैसर्गिक आहार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पशू-पक्ष्यांमध्ये ईश्वराचे अस्तित्व असल्याची धारणा ठेवून ते त्यांचे भरणपोषण करतात. जखमी पक्षी आढळल्यास उपचार करून निसर्गात सोडून देतात. मुंगूस, घार, कावळे आदींवर त्यांनी वैद्यकीय उपचार करून घेतले आहेत. त्यासाठी ते कुणाची मदत घेत नाहीत. पक्षी सांभाळायची इच्छा असलेल्यांना साहाय्य करण्याची पाशा यांची भूमिका आहे.

दरम्यान, लातूर शहरातील वसुंधरा फाउंडेशन, साईनाथ सांस्कृतिक युवा मंच, साईनाथ गणेश मंडळ आदी संघटनांच्या पुढाकाराने उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणपोईचा उपक्रम राबविला जात आहे. येत्या काही दिवसांत शहरातील विविध भागात पशुपक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचा आणखी काही मंडळांचा प्रयत्न आहे.

अशीही "डॉक्‍टरी' सेवा
आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) - आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल गेल्या पाच वर्षांपासून केवळ उन्हाळाच नव्हे, तर अन्य ऋतूंमध्येही चिमण्यांसाठी पिण्याचे पाणी, धान्याची व्यवस्था करीत आहेत. त्यामुळे सकाळ- सायंकाळ त्यांच्या घरासमोर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत आहे. त्याचे शल्य डॉ. अग्रवाल यांना टोचत होते. त्यामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. खास उन्हाळ्यात चिमणीपाखरांसाठी पाणी, धान्य मिळावे म्हणून त्यांनी घराच्या गच्चीवर तसेच परसबागेत व्यवस्था केली आहे. घराचे छप्पर, पायऱ्या, अंगणात ते पाणी, धान्य ठेवतात. घर परिसरातील झाडांवरही भांडी लटकवून त्यात धान्य, पाण्याची व्यवस्था करतात. सुरवातीला मात्र चिमण्या दिसल्या नाहीत. आता मात्र चिमण्यांसह इतरही पक्षी मोठ्या संख्येने न चुकता सकाळ व सायंकाळी गोळा होत आहेत. केवळ उन्हाळाच नव्हे तर कायमस्वरूपी हा उपक्रम राबवीत असल्याचे ते सांगतात.

एक घास चिऊचा...
अंबड (जि. जालना) - "एक घास चिऊचा - एक घास काऊचा' म्हणत मत्स्योदरी महाविद्यालयाच्या आवारात पक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन' व्यासपीठाचे सदस्य, प्राचार्य डॉ. भगवंतराव कटारे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विश्‍वासराव कदम, प्राध्यापकांनी पुढाकार घेतला आहे.

महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. डॉ. शिवशंकर घुमरे यांनी "यिन'चे सदस्य, कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या वेगवेगळा झाडांच्या शेंड्यावर पक्ष्यांना चारा-पाण्यासाठी प्लास्टिकच्या कुंड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी नसलेला पक्ष्यांचा चिवचिवाट आता ऐकू येऊ लागला आहे. प्रा. डॉ. शिवशंकर घुमरे, प्रा. डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. संतोष काटकर, "यिन'चे अध्यक्ष लक्ष्मण गोडसे, उपाध्यक्ष मनोहर भानुसे यांच्यासह गणेश समिंदर, राहुल कासोदे, सुदर्शन कामटे, परमेश्‍वर पोखरकर, रोहिणी पाष्टे, दीपाली बर्वे, राधा खरपडे, राधा शिंदे, पूजा शिंदे, तृप्ती राठोड आदींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, मराठवाड्यात ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांतर्फेही असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com