शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल - नौशाद शेख

शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल - नौशाद शेख

लातूर - ‘देशातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, संशोधन, विधी आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य झाली आहे. 

बहुतांश अभ्यासक्रमांना देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा व देशभरात एकच बोर्ड असेल. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी टाळून स्वआकलनावर भर द्यावा. त्यातूनच करिअरच्या संधी उपलब्ध होतील,’ असे प्रतिपादन पुण्याच्या क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे संचालक नौशाद अहेमद शेख यांनी केले.

‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’च्या (पुणे) वतीने शनिवारी (ता. २०) मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या करिअरविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना श्री. शेख म्हणाले, की दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकीकडे जाण्याचा कल असतो. मात्र, प्रवेश मर्यादित असल्याने सर्व  विद्यार्थ्यांना ते शक्‍य होत नाही. त्यापलीकडे जाऊन करिअरच्या संधी शोधल्या पाहिजेत. पालकांनी क्रेझी न राहता स्वतःच्या मुलांना ओळखावे. पदवी मिळणे म्हणजे यश नव्हे. करिअरची संकल्पना समजून घेतली पाहिजे. विशेषतः मुलींनी भावनेतून निर्णय न घेता बुद्‌ध्यांकानुसार अभ्यासक्रम निवडावा. दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांशी पालकांचा सकारात्मक संवाद गरजेचा असतो. पालकांनी केवळ भौतिक गरजांकडे लक्ष देऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष अभ्यासात मदत करणे आवश्‍यक असते. त्यासाठी पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत यायला हवे. देशभरात एक अभ्यासक्रम व एकमेव परीक्षा बोर्ड अशी रचना येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयारी करणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. देशभरात एम्स, आयआयटी, एनआयटी, आयआयएम, बिट्‌स, आयझर, आयआयएसटी, आयएसटी, नायझर अशा नामांकित संस्था व विद्यापीठे आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकीसह संशोधन व मूलभूत विज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, संगीत, टेक्‍नॉलॉजीला महत्त्व आहे. विज्ञानसह वाणिज्य व कला शाखेतही उत्तम अभ्यासक्रम आहेत. मात्र, तिथेही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आघाडी घेतात. नामांकित संस्थांचे प्रवेश आकलन, गणित, बुद्धिमापन चाचणी व जनरल नॉलेजवर आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व पूर्वपरीक्षेची माहिती घेऊन त्यादृष्टीने सर्वंकष तयारी करणे गरजेचे आहे, असे श्री. शेख यांनी सांगितले. पालकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना देशातील जगभरातील अनेक अभ्यासक्रमांची त्यांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com