वीस मिनिटांत केला रस्ता गुळगुळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पॅचवर्कचे नवे तंत्रज्ञान; पुण्याच्या कंपनीतर्फे प्रात्यक्षिक

पॅचवर्कचे नवे तंत्रज्ञान; पुण्याच्या कंपनीतर्फे प्रात्यक्षिक
औरंगाबाद - डांबरी रस्त्यावरील पॅचवर्क सफाईदारपणे व कमी मनुष्यबळात करण्याचे प्रात्यक्षिक महापालिकेजवळील रस्त्यावर मंगळवारी (ता.16) सायंकाळी दाखविण्यात आले. महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

लंडनमधील नू फाल्ट कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलेले असून, पुणे येथील कंपनीतर्फे हे प्रात्यक्षिक देण्यात आले. या कंपनीकडून काम करून घ्यावे किंवा नाही, यावर लवकरच निर्णय होणार आहे. दिल्ली आणि जयपूर महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून या तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजविण्यात येत आहेत. औरंगाबाद महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा कंपनीने प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार या तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करणाऱ्या पुणे येथील अविडा कंपनीतर्फे मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या शेजारील रोडवर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेते गजानन मनगटे, गटनेते मकरंद कुलकर्णी, विरोधी पक्षनेते अय्युब जागीरदार, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची उपस्थिती होती. दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर कंपनीचे अत्याधुनिक मशिन घेता येईल का, यावर प्रशासनाकडून विचार विनिमय सुरू आहे. अनेकदा खड्डे बुजविताना उंचवटे तयार होऊन अपघाताच्या घटना घडतात, मात्र या तंत्रज्ञानामुळे रस्त्याशी समतल पॅच तयार होऊन खड्ड्याच्या आजूबाजूची जागा लॉक होते. रस्त्यावर खड्डा पडलेल्या ठिकाणचा भाग गॅसच्या साह्याने तापविला जातो. त्यानंतर त्याठिकाणी डांबरमिश्रित रसायन टाकून बारीक खडी-मिश्रित थर टाकला जातो. त्यानंतर त्यावर छोटा रोलर फिरवला जातो. त्यामुळे खड्डा बुजविलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे आयुष्यमान वाढते, असा दावा कंपनीचे अधिकारी अस्लम शेख यांनी प्रात्यक्षिक दाखविताना केला.

या तंत्रज्ञानाचा फायदा
ग्रीन टेक्‍नॉलॉजीमुळे खड्ड्याच्या ठिकाणी निघालेली खडी, डांबराचा पुनर्वापर
तंत्रज्ञानामुळे प्रदूषणात सात टक्‍क्‍यांपर्यंत घट
तीन वर्षे पॅचवर्कची गरज नसल्याने दरवर्षीच्या खर्चात बचत
उपकरण हाताळण्यासाठी केवळ चार माणसांची गरज; मनुष्यबळाची बचत
एक बाय दोन फुटांचा खड्डा वीस मिनिटांत बुजविणे शक्‍य

Web Title: road clean in 20 minit