रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सर्वेक्षणासाठी दिले 18 लाख रुपये; ओमप्रकाश वर्मा यांच्या प्रयत्नाला यश

सर्वेक्षणासाठी दिले 18 लाख रुपये; ओमप्रकाश वर्मा यांच्या प्रयत्नाला यश
औरंगाबाद - बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या रोटेगाव-कोपरगाव या 35 किलोमीटरच्या नवीन मार्गासाठी रेल्वे मंत्रालय मंडळाने मंजुरी दिली आहे. या नव्या मार्गासाठी रेल्वे संघटना, दिवंगत माजी आमदार शालीग्राम बसय्ये बंधू यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी18 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.

गेल्या 20 ते 22 वर्षांपासून या मार्गासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यापूर्वी रोटेगाव-पुणतांबा हा मार्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी दिवंगत माजी आमदार शालीग्राम बसय्ये बंधू यांनी 1995 मध्ये पायी चालत जाऊन या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर 1998 मध्ये रोटेगाव-पुणतांबा या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती; मात्र गोदावरी नदीमुळे हे सर्वेक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतर या मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव रेल्वेमार्गाची 2000 पासून मागणी सुरू झाली. यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी आंदोलन उभारले. गेल्या वर्षी याच मार्गासाठी त्यांनी रक्‍ताने लिहिले पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठवले होते. एवढेच नाही तर विभागीय आयुक्‍त कार्यालय, दिल्ली येथेही त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.

साई संस्थान शताब्दी महोत्सव एक ऑक्‍टोबरपासून साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त देशभरातून लाखो भाविक शिर्डीला येणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गासाठी लवकरच निविदा निघणार आहे. काही दिवसांत काम सुरू होणार आहे. प्रत्येक दिवशी साधारणतः एक किलोमीटरचा सर्व्हे होईल. दीड महिन्यात सर्व्हेचे काम पूर्ण होणार आहे.

रोटेगाव-कोपरगाव मार्गासाठी लढा उभारणारे दिवंगत माजी आमदार शालीग्राम बसय्यै बंधू यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. साई संस्थान व इतरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे काम सुरू होत आहे. या नव्या मार्गामुळे दक्षिण भारत शिर्डीशी जोडला जाणार आहे. याचा फायदा साईभक्‍तांना होईल. मराठवाडा रेल्वे विकास समितीला आंदोलन करावे लागले. सर्व्हे झाल्यानंतर कामाला लवकर सुरवात व्हावी.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती.