आरएसएसचे मुख्यालय उडविण्याची धमकी?

आरोपी शोएब
आरोपी शोएब

नांदेड - नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) मुख्यालय उडविण्याची धमकी देणाऱ्या तोतया वकिलाविरुध्द दहशतवाद विरोधी सेलच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

दहशतवाद विरोधी सेलचे हवालदार रामदयालसिंह ठाकूर यांनी वजिराबाद ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस आयुक्त नागपूर कार्यालयातील विशेष शाखेने त्यांना मिळालेले निनावी पत्र ९ जुलै २०१८ रोजी नांदेडच्या दहशतवाद विरोधी सेलकडे पाठविले. या पत्रानुसार शेख शादुल शेख रसूल रा.गल्ली नंबर २, पानदान रोड, बरकत कॉम्प्लेक्स, देगलूर नाका, नांदेड हा माणूस नागपूर येथे गेला होता. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची चित्रफीत काढून आणली आहे. आणि ते कार्यालय उडवून देण्यासाठी तो वारंवार नांदेड ते नागपूर असा प्रवास करीत आहे. 

कोल्हापूर येथील स्थानिक दहशतवाद विरोधी सेलनेही या व्यक्तीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून ताब्यात घेतले होते, पण त्यावर कोणतीच कारवाई न करता त्याला सोडून दिले. या आशयाचे पत्र नांदेडला आल्यानंतर दहशतवाद विरोधी सेलचे फौजदार गणेश कराड यांनी शेख शादुल शेख रसूलची चौकशी केली. 

या चौकशीत त्यांच्या पथकाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेख शादुल शेख रसूल हा यापूर्वी कधीच नागपूर किंवा कोल्हापूर येथे गेलेला नाही. शेख शादुल शेख रसूलने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भाने नुकसान भरपाई मिळवून देतो म्हणून तोतया वकील शोएब अहेमद सिद्दीकी जहिरोद्दीन सिद्दीकी रा. मदिनानगर, देगलूर नाका, नांदेड याने आपण वकील असल्याची बतावणी करुन शेख शादुलच्या वडिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून १७ ते १८ लाख रुपये उकळले. त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले. 

या मागणीतून बचाव व्हावा व शेख शादुल हा या चौकशीत अडकवावा, या उद्देशाने शोएब अहेमद सिद्दीकेने असा निनावी अर्ज नागपूरच्या दहशतवाद विरोधी सेलकडे पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र या प्रकरणी नांदेड व नागपूर पोलिसांची झोप उडाली होती.

सरकारी कार्यालयाला व अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या तोतया वकील शोएब अहेमद सिद्दिकी याच्या चौकशीची परवानगी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिली. यात सखोल चौकशी करून तपास करण्यात येईल. 
- संदीप शिवले, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com