मराठावाड्यात मंत्र्यांची नाचक्की, प्रदेशाध्यक्षांना चकवा

Raosaheb Danve
Raosaheb Danve

परळी, परतूर, भोकरदनमध्ये भाजपचा पराभव

औरंगाबाद- महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर या दोन विद्यमान मंत्र्यांची नगरपालिका निवडणुकीत पुरती नाचक्की झाली आहे. महिनाभरापासून परळीत मुक्काम ठोकून धनंजय मुंडे यांनी 33 पैकी 27 जागा जिकंत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली. तर भाजप, सेना, रिपांई युतीला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.

परतूर नगरपालिकेत मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदाताई या पराभूत झाल्याने त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. तिथे कॉंग्रेसच्या विमल जेथलिया नगराध्यपदी विजयी झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांना मतदारांनी भोकरदन नगरपालिकेत पुन्हा एकदा चकवा दिल्याने पालिका ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या तिन्ही दिग्गजांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रचारासाठी भाजपचे निम्मे मंत्रीमंडळ मैदानात उतरवून देखील मतदारांनी आपल्याला का नाकारले, याचे आत्मचिंतन भाजप नेत्यांना करावे लागणार आहे.

सत्ता 'स्वप्नच'
प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या भोकरदनमध्ये कॉंग्रेसने बाजी मारली. 15 वर्षापासून भोकरदन नगरपालिकेवर आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. 2011 मध्ये नगरपालिकेत भाजपचा केवळ 1 नगरसेवक विजयी झाला होता. तर राष्ट्रवादी 9 व कॉंग्रेस 7 जागांसह सत्तेवर होती. राष्ट्रवादीच्या अर्चना चिने या नगराध्यक्ष होत्या. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने रावसाहेब दानवे यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोर लावला पण तो कमी पडला. पक्षात इतरांना महत्व न देणे, कार्यकर्त्यांशी फटकून वागणे, याचा फटका दानवे यांना सर्वच निवडणुकीत बसत आला आहे. अगदी लोकसभा निवडणूक व मुलाच्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत भोकरदनमधून भाजप पिछाडीवर राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती नगरपालिकेतही झाली. 17 पैकी 12 जागा जिंकत कॉंग्रेसचे राजेंद्र देखमुख नगराध्यक्षपदी विराजमान झाले. भाजपची प्रगती 1 वरुन 3 जागा एवढीच काय ती झाली.

परळीत धंनजय 'दादा'
पाच वर्षांपुर्वी काका कै. गोपीनाथ मुंडे यांना थेट आव्हान देत त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेत फोडाफोडी करत परळीत सत्तांतर घडवून आणले होते. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी पंकजा मुंडे यांनी दवडवली. सत्ता, मंत्रीपद असूनही परळीच्या मतदारांनी धनंजय मुंडे यांच्याच पारड्यात आपले वजन टाकले. 33 पैकी तब्बल 27 जागा जिकंत धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी पंकजावर मात करत नगरपालिकेतील सत्ता कायम राखली. भाजपला केवळ 4 जागांवर समधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सरोजनी हलगे 6500 मंतानी विजयी झाल्या. शिवसेना, कॉंग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकता आली.

परतूरात भाजपची ताकद वाढली, पण...
परतूर नगरपालिकेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंदाताई यांचा पराभव झाला असला तरी भाजपची ताकद मात्र वाढली आहे. 2011 मध्ये 1 नगरसेवक असलेल्या परतूर नगरपालिकेत यंदा भाजपचे 6, शिवसेना- 2, तर भाजपप्रणित शहर विकास आघाडीचे 2 असे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. परंतु, नगराध्यपदाच्या निवडणुकीत मंदाताई लोणीकर यांचा कॉंग्रेसच्या विमल जेथलिया यांनी 1324 मतांनी पराभव केल्यामुळे सुरेश जेथलिया यांनी नगरपालिकेवरील सत्ता व वर्चस्व कायम राखले.

लोणीकरांनी संपूर्ण ताकद पणाला लावली, प्रचाराला मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना आणले, पण ते सर्व "अर्थहीन' ठरले सुरेश जेथलिया यांचे 25 वर्षापासून परतूर नगरपालिकेवर वर्चस्व राहिले आहे. 2011 मध्ये 18 पैकी 11 जागा जेथलिया यांच्या जनविकास आघाडीला मिळाल्या होत्या. तर कॉंग्रेस 6 व भाजप 1 जागेवर विजयी झाली होती. परतूर शहराशी नसलेला जनसंपर्क, व केवळ ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्यानेच मंदा लोणीकर यांचा पराभव झाल्याचे बोलले जाते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com