शेतकऱ्यांची दैना, ऐकून कोणी घेईना! 

beed-farmer
beed-farmer

आपल्याच कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी आपल्यालाच खटपट करावी लागते. शिवाय कोणतीही शासकीय योजना ही पैशांशिवाय मिळत नाही. पाचशे व हजार रुपयांच्या बंद झालेल्या नोटांच्या स्वरूपात बॅंकांमध्ये जमा झालेली रक्कम ही साडेतीन हजार कोटी रुपये आहे. त्या तुलनेत या काळात केवळ चारशे कोटी रुपयांचे चलनच जिल्ह्यात आले. शहरी बॅंकांनी यातील 50 कोटी रुपयेही ग्रामीण शाखांना दिले नाहीत. त्यामुळे बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. आजही शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना बॅंकांमध्ये चकरा कराव्या लागत आहेत. यंदा शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. पण, अधिकाऱ्यांच्या हातावर "नोटा' टेकवल्याशिवाय रोहित्र, केबल, फ्युज आदी साहित्य शेतकऱ्यांना मिळत नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठीच्या पुस्तकात प्रशासनानेही याची कबुली दिली आहे. पण, राजकारणात दंग असलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांच्या अडचणींचे काहीही देणे घेणे नाही. 

उमेदवार चाचपणी सुरू 
राजकीय उलाढालींनीही जिल्हा चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच पालिका निवडणुका झाल्या. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजप व "राष्ट्रवादी'सह कॉंग्रेस, शिवसेना व शिवसंग्रामने मनावर घेतली आहे. भाजप वगळता इतर पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. 

सतरंज्या, स्पीकर, चहा पुढे अन्‌ नेते मागे 
अंबा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचारातील किश्‍श्‍यांचीच चर्चा रंगत आहे. दिवंगत नेते बाबूराव आडसकर यांच्या वर्चस्वाखालील कारखाना पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी भाजप नेते रमेश आडसकरांनी मतदार संवादाची एक फेरी पूर्ण केली. मात्र, त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचाच एक गट मैदानात उतरला. मागच्या आठवड्यात या गटाच्या नेत्यांनी मतदार संवाद फेरी काढली. पण, कुठल्या गावात गेले तर कोणाची ओळख नाही, कोणाकडे बसणार, असे अनेक प्रश्‍न होते. त्यामुळे त्यांनी शक्कल लढवली आणि ज्या गावात जायचे तेथे अगोदरच एका वाहनात सतरंज्या, स्पीकर, चहाची केटली पोचायची. सार्वजनिक सभागृहात हे सर्व साहित्य पोचताच खेड्यातली मंडळी "काय आहे' हे पाहण्यासाठी जमत नि ठिकाणावर पोचलेले नेते भूमिका मांडत. 

बदामराव पंडितही शिवसेनेत जाण्याच्या तयारीत 
दरम्यान, पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरी आणि क्षीरसागरांच्या घरातच दुही चर्चेत राहिली. राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद गेले असले तरी उपाध्यक्ष आपल्याकडे यावे यासाठी "एमआयएम'चा गट आघाडीने गळाला लावला आहे. एकूणच क्षीरसागरांत जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर अशी उभी फूट तयार झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री बदामराव पंडितही शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com