लातूरमध्ये बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

लातूर जिल्ह्यात अनधिकृत एक्‍स्चेंजच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये संपर्क साधला जायचा. परराष्ट्रातून अथवा भारतातून विदेशात कॉल करणाऱ्याला थेट कॉलऐवजी या बनावट एक्‍स्चेंजला संपर्क साधावा लागत असे. बनावट एक्‍स्चेंजमुळे आलेला किंवा केलेला कॉल हा आंतरराष्ट्रीय न राहता लोकल कॉल म्हणून गणला जात होता. 
 

औरंगाबाद : लातूर जिल्ह्यात अनधिकृत एक्‍स्चेंजच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये संपर्क साधला जायचा. परराष्ट्रातून अथवा भारतातून विदेशात कॉल करणाऱ्याला थेट कॉलऐवजी या बनावट एक्‍स्चेंजला संपर्क साधावा लागत असे. बनावट एक्‍स्चेंजमुळे आलेला किंवा केलेला कॉल हा आंतरराष्ट्रीय न राहता लोकल कॉल म्हणून गणला जात होता. 

लातुरात सुरू असलेल्या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजच्या ठिकाणी नकली "व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल' तयार करून विदेशात (परराष्ट्रांमध्ये) संभाषण घडवून आणले जात होते. जगातील अनेक देशांमध्ये केल्या जाणाऱ्या दूरध्वनीवरील संभाषणावर गुप्तचर यंत्रणांची करडी नजर असते. अशा परिस्थितीत कॉलचा सोर्स किंवा कॉल केल्याची जागा उघडकीस येऊ नये म्हणून, असे एक्‍स्चेंज तयार केले जाऊ शकतात. ज्या व्यक्तीला आखाती राष्ट्रात संपर्क साधून संभाषण करावयाचे आहे, त्याला तिथे थेट कॉल करण्याची गरज नाही. या बेकायदा एक्‍स्चेंजला संपर्क केल्यावर येथील "व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल'च्या साहाय्याने हा कॉल थेट त्या राष्ट्रात जोडून दिला जातो.

अशा पद्धतीने आलेला किंवा परदेशात केलेला फोन कॉल हा केवळ या एक्‍स्चेंजपर्यंतच ट्रेस होतो. असा कॉल आंतरराष्ट्रीय असतानाही तो लोकल कॉल दिसून येतो. या पद्धतीने कॉल करणारा आणि ज्याला कॉल केला आहे, ती व्यक्ती सहज ट्रेस होत नाही. या यंत्रणेचा वापर करून या एक्‍स्चेंजमार्फत अनेकदा आंतरराष्ट्रीय कॉल झाले असण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी व्यक्त केली. किमान पाच ते सहा महिन्यांपासून या केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले कॉल ट्रान्सफरिंग लष्कराच्या काश्‍मिरातील गुप्तचर विभागाने हेरले होते. मागील सुमारे पाच महिन्यांपासून येथे सुरू असलेले "संभाषण ग्लोबल; मात्र कॉल लोकल' गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होते. या संपूर्ण बनावट यंत्रणेवर पाळत ठेवून हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

टॅग्स