समृद्धी महामार्गालगत ‘हायटेक’ सुविधांची चाचपणी

Samruddhi-Highway
Samruddhi-Highway

औरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (प्रस्ताव) मागविले आहेत. या रस्त्यालगत गॅस, ऊर्जा पोचविण्यासाठीचे जाळे, इंधन वाहिनी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क आदींच्या चाचपणीसाठी सुमारे तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. 

नागपूर आणि मुंबईदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ७०० किलोमीटरच्या समृद्धी सुपर कम्युनिकेशन एक्‍स्प्रेसवेलगत युटिलिटी कॉरिडॉरची तजविज आधीच करण्यात आली आहे. त्यातून आता कोणत्या सुविधा उभारायच्या, याची चाचपणी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या महामार्गालगत असलेल्या जिल्ह्यांना त्याचा लाभ कसा आणि कोणत्या प्रकारे होणार आहे, याचा अभ्यास करण्यासाठी कन्सल्टंटची नेमणूक एमएसआरडीसी करणार आहे. या हायवेमध्ये सोडण्यात आलेल्या युटिलिटी कॉरिडॉर आणि रस्त्याच्या रेखांकनाच्या आधारावर हा अहवाल तयार केला जाणार आहे.

अपेक्षित काम...
टप्पा १ - युटिलिटी कॉरिडॉर (लाइन टाकण्यासाठीची जागा) तपासून गॅस, ऊर्जा, टेलिकम्युनिकेशन, पाणी, ऑप्टिकल फायबर लाइनची चाचपणी. त्यांचा उभारणी कालावधी, सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा. 

टप्पा २ -  संभाव्य करप्रणाली, कागदोपत्री सोपस्कार, गरज असल्यास स्पेशल पर्पज व्हेइकल उभारणे. 

टप्पा ३ -  आर्थिक ढाचा, कायदेशीर बाबी, निविदांसाठी लागणारे कागदी व्यवहार आदी. 

टप्पा ४ -  कंत्राट करण्यासाठी मदत, प्रत्यक्ष कामासाठी एजन्सींची नेमणूक, प्रकल्प व्यवस्थापनासाठी सहकार्य आदी. 

दहा जिल्ह्यांना फायदा 
‘समृद्धी’अंतर्गत येणाऱ्या दहा जिल्ह्यांना आणि त्यांच्या लगतच्या जिल्ह्यांनाही या माध्यमातून फायदा होऊ शकतो. इंधनाच्या लाइनच्या माध्यमातून पुरवठा झाल्यास रस्त्यांवरून इंधन वाहतूक वाचेल आणि त्याचा फायदा इंधन किमतींतही होऊ शकतो. ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट केबल उभारणी झाल्यास डाटा सेंटरच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. 

‘युटिलिटी कॉरिडॉर’साठीचा अहवाल प्राप्त झाल्यावर उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा मार्गही पाहिला जाणार आहे. हे काम पुढे लोटले जाणार नसून महामार्ग उभारणीच्या साथीनेच या कॉरिडॉरचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
- राधेश्‍याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com