नांदेडला सात गावांचा मतदानावर बहिष्कार

नांदेडला सात गावांचा मतदानावर बहिष्कार

नांदेड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले असून, जिल्ह्यातील सात गावांनी वेगवेगळ्या कारणांमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. पिंपळगाव (ता. हदगाव), मेंढला खुर्द (ता. अर्धापूर), दिवशी (ता. भोकर) या तीन गावांसह उमरी तालुक्‍यातील बोथी, मोखंडी, तुराटी, सावरगाव (कला) आणि बितनाळ या पाच गावांचा समावेश आहे.


पिंपळगाव (ता. हदगाव) येथील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्यामुळे येथे एक हजार 281 मतदारांपैकी केवळ 27 मतदारांनी मतदान केले आहे. येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा लेखी इशारा दिला होता. प्रशासनाने संबंधित अतिक्रमण काढले नसल्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मेंढला खुर्द (ता. अर्धापूर) येथील दोन तरुणांचा नुकताच अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही व वेळेवर उपचार झाले नाहीत, त्यामुळे या घटनेचा निषेध करत गावकऱ्यांनी मतदान केले नाही.


दिवशी (ता. भोकर) येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावाला रस्ता नाही, त्याचबरोबर बंधाऱ्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. तसेच तेलंगणातील म्हैसा येथे असलेल्या सुधावागू प्रकल्पाचे बॅंकवाटर या गावापर्यंत येत असल्यामुळे त्याचाही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांचा गेल्या अनेक निवडणुकींत बहिष्कार कायम आहे.
उमरी तालुक्‍यातील बोथी, मोखंडी, तुराटी, सावरगाव आणि बितनाळ या गावांना अजूनही कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे रस्ता करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. ती पूर्ण होत नसल्यामुळे या पाचही गावांनी मतदानांवर बहिष्कार टाकला. या गावात उपजिल्हाधिकारी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष गेले होते, मात्र गावकऱ्यांचे समाधान झाले नाही.


वागदरवाडी (ता. लोहा) येथे पाणीपुरवठा, रस्ते, साठवण तलाव आदी मूलभूत सोयी-सुविधांसाठी बहिष्कार टाकण्यात आला होता. तहसीलदार यांनी गावात येऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन मतदानासाठी आवाहन केले. दरम्यान, एक मतदार मतदानासाठी तयार झाला. त्या वेळी येथील सरपंच महिला राऊबाई केंद्रे यांनी प्रशासन मतदारांवर दडपण आणत असल्यामुळे निषेध करत दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक व तहसीलदारांनी पुन्हा गावकऱ्यांची बैठक घेऊन समजूत काढून आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता मतदानाला सुरवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com