उद्धव ठाकरेंच्या दुर्लक्षाला हिंगोलीतील सेना नेते कंटाळले

प्रकाश सनपूरकर
शुक्रवार, 3 मार्च 2017

हिंगोली : जिल्ह्यातील शिवसेना नेते व कार्यकर्ते पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सततच्या दुर्लक्षाला कंटाळून निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे कधी काळी हिंगोली जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शिवसेनेला गेल्या काही दिवसापासून उतरती कळा लागली आहे. पक्ष आणि पक्षप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे सेनेची स्थिती वाईट होत चालली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील शिवसेना नेते व कार्यकर्ते पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सततच्या दुर्लक्षाला कंटाळून निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे कधी काळी हिंगोली जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शिवसेनेला गेल्या काही दिवसापासून उतरती कळा लागली आहे. पक्ष आणि पक्षप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे सेनेची स्थिती वाईट होत चालली आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक वर्षापासून शिवसेनेचे मोठे वर्चस्व होते. नगरपालिका, पंचायत समित्या, बाजार समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत शिवसेनेने सत्ता केंद्र कायम ताब्यात ठेवली. भाजपला कुठेही संधी मिळू दिली नाही. याशिवाय अनेकवेळा विधानसभा व लोकसभेत देखील प्रतिनिधित्व केले. मात्र, गेल्या काही वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष हा जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांसाठी गंभीर विषय बनला आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्री. ठाकरे यांची एकच सभा तीन विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात श्री. ठाकरे आलेच नाहीत. त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागला. त्यानंतर संपूर्ण राज्यात केवळ हिंगोली जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आली. पण या यशाचे कौतुक तर सोडाच पण श्री. ठाकरे यांनी साधी त्याची पोहोच पावती सुद्धा दिली नाही. हाच प्रकार पुढेही चालू राहिला.

मुंबईतील संपर्कप्रमुख नेमल्यानंतर त्यांचा एक पाय मुंबईत कायम टिकून असतो तर दोन तीन महिन्याला कधीतरी एखादी बैठक जिल्ह्यात घेतली जाते. मात्र, आता तर निवडणुकांचे तिकिट वाटप करण्यासाठीही जिल्हा संपर्कप्रमुख येईनासे झाले आहेत. स्थानिक पातळीवर डॉ. पंडितराव शिंदे यांना जिल्हा संपर्कप्रमुखांनी जिल्हा सहसंपर्कप्रमुखाचे पद दिले. त्यामुळे आता नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीला संपर्कप्रमुख आमदार सुधाकर भोईर हे फिरकलेच नाहीत.

शिवसेनेत कुटुंबियांना उमेदवारी देण्याची पद्धत फारशी नाही. पण सहसंपर्कप्रमुख डॉ. शिंदे यांनी पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. त्यातही त्यांची जागा पराभूत झाली. 

मात्र या प्रकाराने शिवसेनेचे इतर नेते अत्यंत दुखावले आहेत. कधीही घराणेशाही न चालवणाऱ्या नेते व कार्यकर्त्याना या गोष्टीचा धक्‍का बसला. पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. अखेर या प्रकारात भाजपने सेनेचे ग्रामीण नेटवर्क जिल्हा परिषद निवडणुकीत बऱ्यापैकी ताब्यात घेतले. आता निराशेत सापडलेले शिवसेनेचे काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Shiv Sena Uddhav Thackray Hingoli BJP