श्रीहरी अणेंची गाडी फोडली, शिवसेनेचा राडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अणेंच्या गाडीवर दगडफेक 
श्रीहरी अणे कार्यक्रमस्थळी न येताच परतले 
शिवसेना कार्यकर्त्यांचा तब्बल दोन तास प्रखर विरोध 
घोषणाबाजी करणारे मनसे कार्यकर्ते ताब्यात 
पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

औरंगाबाद - स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे आयोजित कार्यक्रम शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे उधळला गेला. विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना भाषण न देताच, रस्त्यातून परतावे लागले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असलेल्या श्रीहरी अणे यांची गाडी महसूल प्रबोधिनीच्या रोडवर पोचताच शिवसेना कार्यकर्त्यांनी दगडफेक करून ती फोडली; त्यामुळे अणे कार्यक्रमाला न येताच परतले. आयोजकांनीही अणेंशिवाय कार्यक्रम आटोपता घेतला. 

सुरवातीला मनसेचे कार्यकर्ते धडकले 
कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्‍यता असल्याने दुपारी अडीचपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चारच्या सुमारास गेटवर मनसेचे कार्यकर्ते आले. त्यांनी घोषणाबाजीस सुरवात करताच पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. यामध्ये बिपिन नाईक, संदीप कुलकर्णी, ऍड. निनाद खोचे यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

गेटवर राडा 
मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोनच मिनिटांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजू वैद्य, नंदू घोडेले, राजेंद्र जंजाळ, दिग्विजय शेरखाने, शिल्पाराणी वाडकर, मकरंद कुलकर्णी, राजू दानवे, मनोज गांगवे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते गेटवर आले. त्यांनी कार्यक्रमात जाण्याचा आग्रह धरला; मात्र पोलिसांनी त्यांना गेटवर थांबविले. त्यानंतरही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते गेटवर ठाण मांडून उभे होते. 

अंबादास दानवे यांनी उपजिल्हाधिकारी सावरगावकर यांना फोन करून सांगितले, की महसूल प्रबोधिनी महाराष्ट्र सरकारची आहे; तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा इथे का केली जात आहे? अशा कार्यक्रमांना परवानगी का दिली? यावर आयोजकांना वेगळ्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली. यानंतरही शिवसेनेचा विरोध कायम राहिला. आम्ही कार्यक्रमात आयोजक, प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो आहोत, त्यांचे विचार ऐकल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, आम्हाला कार्यक्रमात बसू द्यावे, असा आग्रह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरला; मात्र तगडा बंदोबस्त लावलेल्या पोलिसांनी कुणालाही आतमध्ये सोडले नाही. 

मागील गेटने आणण्याचा प्रयत्न फसला 
महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम होता; मात्र गेटवर शिवसेना कार्यकर्ते असल्याने तेथून गाडी आणणे शक्‍य नव्हते. त्यामुळे आयोजकांनी त्यांना प्रबोधिनीत मागील बाजूने आणण्याची तयारी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर गाडी आणून पाठीमागून सभागृहात जावे अशी तयारी केली. मात्र, मागे कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्याने मागील बाजूनेही कार्यक्रम घेता आला नाही. 

रस्त्यावर गाडी येताच फोडली 
गेटसमोर शिवसेना कार्यकर्ते तब्बल पाऊण तास ठाण मांडून होते. 4 वाजून 55 मिनिटांनी श्रीहरी अणे यांची गाडी दूध डेअरी चौकापासून प्रबोधिनीकडे येत होती. मात्र, पुढे शिवसेना कार्यकर्ते दिसल्याने त्यांनी आपली गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील मैदानात नेली. त्यानंतर शिवसेना कार्यकर्ते येथे पोचले. तेथील सुरक्षा रक्षकांना अणेंना आता कसे काय उभे केले, त्यांना बाहेर काढण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली. यानंतर गाडीत एक पोलिस बसवून गाडी गेटच्या बाहेर काढण्यात येत होती, तोपर्यंत कार्यकर्ते गेटवरच थांबलेले होते. गाडी रस्त्यावर येताच घोषणाबाजी करत तीन ते चार कार्यकर्त्यांनी काचावर हाताचे बुक्के मारले. यानंतर गाडी पुढे जात असताना पाठीमागील कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काच फोडली. यानंतर गाडी पुन्हा जालना मार्गाने हॉटेलकडे निघून गेली. 

कार्यक्रम संपेपर्यंत कार्यकर्त्यांचे ठाण 
महसूल प्रबोधिनीच्या सभागृहातील कार्यक्रम पूर्णपणे संपेपर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांनी रोडवरच ठाण मांडले होते. गेटवरून गेल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते दूध डेअरीच्या जवळ थांबून होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येथून निघून गेले. 

फुटीरतावाद्यांना असाच धडा शिकवू ः अंबादास दानवे (जिल्हाप्रमुख शिवसेना) 
संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आता जे फुटीरतावादी आहेत, त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल. निजाम, रजाकारांच्या जुलमाविरुद्धही लढा दिला होता. संयुक्त महाराष्ट्रच कायम राहणार असून, फुटीरतेची भाषा करणाऱ्यांना असाच धडा शिकवला जाईल. 

Web Title: Shri ane car breake