औरंगाबाद - अभियांत्रिकी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शिवसेनेच्या नगरसेवकाच्या घरात सोडविल्याच्या प्रकरणातील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षा केंद्रप्रमुख आणि सदस्य अशा पाच जणांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी गुरुवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला; तर सीताराम सुरे यांच्यासह विद्यार्थी, अशा 24 जणांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त केले. या गुन्ह्यातील तीन विद्यार्थिनी व एका विद्यार्थ्याची यापूर्वीच जामिनावर मुक्तता झाली आहे.
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षेत शिवसेना नगरसेवक सुरे यांच्या घरात प्रश्नपत्रिका सोडवल्या जात असताना पोलिसांनी छापा घातला होता. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी प्रा. विजय आंधळे, संस्थाचालक सदस्य मंगेश मुंढे, संस्थेचे अध्यक्ष ऍड. गंगाधर मुंढे, परीक्षा केंद्रप्रमुख प्रा. अमित कांबळे आणि प्राचार्य संतोष देशमुख यांच्यासह 24 विद्यार्थ्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरे यांच्यासह 24 आरोपी विद्यार्थ्यांची सध्या विचारपूस पूर्ण झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करावी. उर्वरित पाच जणांना पाच दिवस वाढीव पोलिस कोठडी मंजूर करावी, अशी विनंती तपास अधिकारी तथा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे आणि विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी न्यायालयास केली.
|