अभय योजनेतून फक्त सहा कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

औरंगाबाद - शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेची सुमारे तीनशे कोटींपेक्षा जास्तीची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महिनाभर अभय योजना सुरू करण्यात आली होती; मात्र त्यात केवळ जास्तीचे सहा कोटी रुपयेच वसूल झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ३०) अभय योजनेची मुदत संपणार आहे. 

शहरातील सुमारे दोन लाख मालमत्ताधारकांकडे महापालिकेची तीनशे कोटींपेक्षा जास्तीची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यात व्याज व शास्तीची रक्‍कम १२० कोटींची आहे. महापालिकेतर्फे वारंवार प्रयत्न करूनदेखील कराची वसुली होत नसल्याने पुणे महापालिकेच्या धर्तीवर ता. एक ते ३१ मेदरम्यान अभय योजना राबविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.

त्यात एकरकमी थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकाला व्याज व शास्तीच्या रकमेत ६० टक्‍क्‍यांपर्यंत माफी देण्यात आली. केवळ २९ दिवसांत २० कोटींची रक्कम जमा झाली आहे. गतवर्षी मे महिन्यात १४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे वाढीव सहा कोटी हे अभय योजनेतून मिळाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अभय योजनेतून महापालिकेला किमान शंभर कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र केवळ सहा कोटी रुपयेच जमा झाल्याने योजनेला मुदतवाढ देण्यास महापौरांसह आयुक्तांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, गुरुवारी अभय योजनेचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना व्याज व शास्तीच्या रकमेमध्ये सूट मिळणार नाही.

Web Title: six crore in abhay scheme