सोशल मीडियावरील मदतीच्या आवाहनाचा कुटुंबाला आधार!

गणेश पांडे
बुधवार, 17 मे 2017

परभणीः सोशल मीडियावर तासन-तास वेळ घालवणाऱ्यांना आपण वेडा म्हणतो. परंतु या सोशल मीडियाचा वापर जर चांगल्या कामासाठी केला गेला तर अनेकांची घरे उभी राहतात. या साधनांचा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वापर केला तर मोठे कार्य घडू शकते. याची प्रचिती परभणी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत (राजू) काजे यांनी दिली आहे.

परभणीः सोशल मीडियावर तासन-तास वेळ घालवणाऱ्यांना आपण वेडा म्हणतो. परंतु या सोशल मीडियाचा वापर जर चांगल्या कामासाठी केला गेला तर अनेकांची घरे उभी राहतात. या साधनांचा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वापर केला तर मोठे कार्य घडू शकते. याची प्रचिती परभणी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत (राजू) काजे यांनी दिली आहे.

हसनापूर (ता. परभणी) येथे मागे आग लागून चार घरे बेचिराख झाली होती. घरातील एकही गोष्ट हाती लागली नाही. चारही कुटुंबाची परिस्थिती म्हणजे हातावर पोट अशावेळी एखाद्या मध्यमवर्गीय माणसालासुद्धा अचानक उद्‍भवलेल्या अडचणीतून सावरायला काही महिने लागतात. त्यांना कर्ज मिळू शकते. परंतु, या कुटुंबांना परत त्यांचे घर उभे करणे म्हणजे कमीत-कमी तीन ते पाच वर्ष मागे गेल्यासारखे आहे. या सगळ्या गोष्टी पाहून या घटनेच्या फोटोसहीत तलाठी काजे यांनी सोशल मीडियावर त्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातून त्यांनी त्या कुटुंबीयांना घरातील सगळ्या जीवनावश्यक उपयोगी वस्तू, सर्वांना कपडे, भांडी, अंथरूण, पांघरूण अशा विविध वस्तू त्यांना देऊन कुटुंबाला उभे राहण्याचे बळ दिले.

जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख यांनाही हे कळाल्यानंतर त्यांनीही या चार कुटुंबांना प्रत्येकी पाच अशा प्रमाणात घरावरची पत्रे दिली. या उपक्रमात त्यांना जिजाऊ संस्थानचे नितीन लोहट, सुभाष बाकळे, राजेश ओझा, दीपक तलरेजा, अनिल कानसूरकर, आनंद बाकळे, मंडळ अधिकारी नंदकुमार सुपेकर, मोहसीन शेख, तलाठी खुने, पेंडलवार, गुरले, गाढे, सूर्यवंशी या मित्रांनी मदत केली. या उपक्रमात विशेष सहाय्य म्हणून अरुण दीपक कोतवाल, अनंत दळवे, विलास असोलेकर यांचा मोलाचा हातभार लागला.

कॅन्सर रुग्णास केली काजे यांनी मदत
काही दिवसांपूर्वी तलाठी काजे यांनी गौर (ता. पूर्णा) येथील कॅन्सर रुग्णास मदत केली होती. अतिरिकक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री, उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार महेश सावंत, तहसीलदार अश्विनी जाधव, जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख, नितीन लोहट यांच्या हातून ही मदत देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांनी 15 हजार रुपयांची मदत दिली.