माती उचलण्यासाठी नेमलेले मनुष्यबळ गायब!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

औरंगाबाद - शहरातील धुळीला जन्म देणारे मातीचे ढिगारे उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या सत्तावन्न मजुरांपैकी फक्त दहा कर्मचारी आज कार्यरत आहेत. यातील पंचवीस कर्मचारी नाट्यगृहासाठी देण्यात आले, तर अनेकांना एकाच ठिकाणी काम देण्यात आल्याने हे ढिगारे आता रामभरोसे पडले आहेत.

औरंगाबाद - शहरातील धुळीला जन्म देणारे मातीचे ढिगारे उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या सत्तावन्न मजुरांपैकी फक्त दहा कर्मचारी आज कार्यरत आहेत. यातील पंचवीस कर्मचारी नाट्यगृहासाठी देण्यात आले, तर अनेकांना एकाच ठिकाणी काम देण्यात आल्याने हे ढिगारे आता रामभरोसे पडले आहेत.

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या आक्रसण्यासाठी आणि धुळीचा साम्राज्यासाठी जबाबदार असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यांच्या सफाईसाठी महापालिकेने दिलेल्या सत्तावन्न कर्मचाऱ्यांपैकी केवळ दहा कर्मचारी या कामासाठी कार्यरत राहिले आहेत. शहरातील दुभाजक आणि रस्त्यालगत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे रस्त्यांची रुंदी घटू लागली असून धुळीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्याला आला घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या सत्तावन्न जणांच्या चमूतील केवळ दहा कर्मचारी आज कार्यरत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करत शहरातील मातीचे ढिगारे उचलणाऱ्या या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त दहावर आली आहे.

पंचवीस कर्मचारी नाट्यगृहाच्या दिमतीला
रस्ते आणि दुभाजकांलगत असलेले मातीचे ढिगारे उचलण्यासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी विखुरले गेले आहेत. सत्तावन्नपैकी पंधरा जणांची रवानगी संत तुकाराम नाट्यगृह तर दहा कर्मचारी हे संत एकनाथ रंगमंदिरच्या दिमतीला देण्यात आले आहेत. याशिवाय तेरा कर्मचारी रात्रीच्या झाडणीसाठी शहराच्या मध्यवस्तीत देण्यात आले आहेत. या उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी किमान दहा कर्मचारी हे कायम गैरहजार असतात. त्यांची आस्थापना विभागाकडे तक्रारपण महापालिकेच्या सफाई विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दहा कर्मचाऱ्यांवरच शहरातील माती आणि धूळ स्वच्छ करण्याची मदार आहे.

खराट्याची साथ कधीपर्यंत?
शहरातील रस्त्यांचे जाळे वाढत असताना त्यांची सफाई आजसुद्धा खराट्यांनीच केली जाते. या रस्त्यांच्या सफाईसाठी आधुनिक तंत्रज्ञान कधी स्वीकारले जाणार, हा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. खराट्याने वरील कचरा तर निघतो पण धूळ तशीच कायम राहत असल्याने लोकांना विकार जडू लागले आहेत. अजून स्वीपिंग मशीनची आवश्‍यकता शहराला असताना केवळ झाडूचा वापर किती दिवस करायचा, असा सवाल नागरिक विचारत आहेत.