वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन्‌ पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, शनिवारी (ता. सात) सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन्‌ अवकाळी पाऊस असे चित्र होते. हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांत काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

औरंगाबाद - मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, शनिवारी (ता. सात) सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन्‌ अवकाळी पाऊस असे चित्र होते. हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांत काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

जालन्यातील तळणी (ता. मंठा) येथे दुपारी चारच्या सुमारास दीड तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. आष्टी, सातोना (ता. परतूर), गोंदी, शहागड (ता. अंबड), घनसावंगी शहर व परिसरात रिमझिम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद), वाळूज भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाळूज परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक भागांत पत्रे उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळली. औरंगाबाद शहरातही मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे शहरभर धुळीचे प्रचंड लोट उठले होते. जागोजागी साचलेला कचराही विखुरला.
 
हिंगोली जिल्ह्यातील मोप (ता. सेनगाव) येथे वीज कोसळून ग्यानदेव निवृत्ती बर्वे या शेतकऱ्याच्या मालकीचा बैल दगावला. केंद्रा बुद्रुक येथे गारांचा पाऊस झाला. वादळामुळे हिंगोलीत धुळीचे लोट उठले, तर औंढा नागनाथ येथे वादळामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने काहीकाळ बंद केली. या वातावरणामुळे आंबा, चिकू, डाळिंब, कांदा बियाणे आदींचे नुकसान झाले. हळदीचे पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. परभणी शहरासह जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्‍यांत वादळी वारे होते. जिंतूर, सेलू, पूर्णा, मानवत तालुक्‍यांच्या काही भागात रिमझिम पाऊस झाला. 

उजनी परिसरात तासभर पाऊस 
उजनी पाटी (ता. अंबाजोगाई) परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊण तास गारांसह पाऊस झाला, तर उजनी येथे एक तास पाऊस झाला. गहू, ज्वारीसह आंब्याचे नुकसान झाले. अनपटवाडी (ता. पाटोदा) येथे शेतात काम करीत असताना भीमराव मुकुंदा अनपट (वय ७०) हे गारपिटीच्या तडाख्यात सापडून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यात उशिरापर्यंत बरसला
लातूर जिल्ह्यातील किल्लारी, निलंगा, औसा, उदगीर व चाकूर परिसराला शुक्रवारी गारपिटीने झोडपले होते. आज रात्री उशिरापर्यंत बेलकुंड, चाकूर, औसा, चापोली, नळेगाव, वडवळ भागात पाऊस होता.

Web Title: storm wind dust rain hailstorm loss