अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्याने संपविले जीवन!

अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्याने संपविले जीवन!

औरंगाबाद - अनेकदा विषय देऊनही यश येत नव्हते. दडपण आणि नैराश्‍याच्या गर्तेत तो अडकत गेला. यातून मनावर विपरीत परिणाम होत गेला अन्‌ आत्महत्येचा मार्ग पत्करून तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याने जीवन संपविले. अत्यंत गंभीर असलेली ही घटना सोमवारी (ता. 21) उघड झाली. ज्ञानेश्‍वर भाऊसाहेब कवडे (वय 22, रा. टीव्ही सेंटर) असे मृताचे नाव आहे.

ज्ञानेश्‍वर कवडे साधारण परिस्थितीतला तरुण. त्याचे वडील भाऊसाहेब कवडे एका संस्थेत शिपाई आहेत. बारावीनंतर जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ज्ञानेश्‍वरने प्रवेश घेतला. पहिले शैक्षणिक वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर त्याला द्वितीय वर्षात अपयश आले. नापास झाल्यामुळे तो निराश झाला. त्याने दोन-तीनवेळा पुरवणी परीक्षा दिली; परंतू विषय निघत नव्हते. एकीकडे घराची जेमतेम आर्थिक परिस्थिती, दुसरीकडे येत असलेले अपयश यामुळे तो दडपणाखाली आला. मुलावरील ताण हलका व्हावा म्हणून वडिलांनी विष्णुनगर येथून टीव्ही सेंटर येथे बस्तान हलविले. तेथे ते भाड्याने राहण्यासाठी आले; पण त्याचे नैराश्‍य दूर होत नव्हते. त्याच्यावर एका ठिकाणी उपचारही सुरू करण्यात आले; पण उपयोग झाला नाही. त्याने सलीम अली सरोवरात उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची नोंद सिडको पोलिसांत झाली.

मी, जीवनाला वैतागलो...
दोन वर्षांपासून तो आजारी होता. विषय निघत नसल्याने त्याने आपण जीवनाला वैतागल्याच्या हताश भावनाही कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्या होत्या. शनिवारी सकाळी त्याला रुग्णालयात येण्याचा आग्रह कुटुंबीयांनी धरला. हो, जाऊ रुग्णालयात असे सांगत त्याने पाचच मिनिटांत आलो, असे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तो घरातून बेपत्ता झाला; पण परत आलाच नाही.

दोन दिवसांपासून बेपत्ता
पोलिसांनी माहिती दिली, की ज्ञानेश्‍वर घरातून गेल्यानंतर तो रात्री परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांसोबतच नातेवाइकांनी शोधमोहीम घेतली; पण तो सापडला नव्हता. त्याने शनिवारीच आत्महत्या केल्याची माहिती तपास अंमलदार आघाडे यांनी दिली.

अशी पटली ओळख
सरोवराच्या किनाऱ्यावर ज्ञानेश्‍वरचे आधारकार्ड काही व्यक्तींना दिसले. त्यांनी आधारकार्डचे छायाचित्र काढले. त्याचवेळी तपास अंमलदार आघाडे व ज्ञानेश्‍वरचे नातेवाईक त्याच्या शोधातच तेथून जात होते. गर्दी दिसल्यानंतर ते थांबले व त्यांनी चौकशी करून त्याचे छायाचित्र पाहिले असता, ज्याचा शोध घेत होतो, त्यानेच आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

अभ्यासाला जीवन-मृत्यू समजू नका
डॉ. मोनाली देशपांडे (मानसोपचारतज्ज्ञ) - जीवन अत्यंत सुंदर आहे. अभ्यास तर आयुष्यात काही मिळविण्याचे माध्यम आहे. ती एक प्रक्रिया असून, अभ्यासाला जीवन-मृत्यू समजू नका. परीक्षेपुरता तुमचा परफॉर्मन्स नाकारला जाऊ शकतो; पण जीवनात सर्वच बाबतींत तुम्ही अपयशी नसता. अभ्यास व जीवन याची जोड लावू नका. खचून जाऊ नका. सकारात्मक विचार व दृष्टिकोन ठेवणे आवश्‍यक असून, मुलांचे असणे किती महत्त्वाचे आहे, हे पालकांनी मुलांना समजून सांगणे अत्यंत गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com