वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या

Umesh-and-Trushna
Umesh-and-Trushna

औरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय १९) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

‘‘मी आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिलं, बीएस्सी होऊनही नोकरी नाही. मी मराठा आहे म्हणून की काय, अशा भावना व्यक्त करून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही गंभीर घटना औरंगाबादेतील चिकलठाणा भागात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आसाराम एंडाईत (वय २२, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने बी. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. नुकतीच त्याने एम. एस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा दिली होती. अनेक महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता.

त्याने दोन कन्सलटन्सीकडे नोकरीसाठी अर्जही केला होता. दोन कंपन्यांमध्ये मुलाखतीही दिल्या. दोन दिवसांपासून तो आजारी होता. आत्महत्येच्या प्रकारानंतर एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोचले. मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. दरम्यान त्याची उत्तरीय तपासणी घाटी रुग्णालयात झाली त्यानंतर रात्री नऊ वाजता चिकलठाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेशचे वडील चिकलठाण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. येथील चौधरी कॉलनीत त्यांचे सहाशे स्क्वेअर फुटाचे घर असून तो मूळ गोलटगाव, (वडाची वाडी, ता. बदनापूर) येथील रहिवासी होता. त्याला मोठा भाऊ व एक लहान बहीण असून आई शेतीकाम करते.  

मुलाखतीपूर्वीच आत्महत्या
शेंद्रा येथे एका कंपनीत मुलाखतीसाठी तो गुरुवारी सायंकाळी चार वाजता जाणार होता. ही बाब त्याने दुपारी कुटुंबीयांना सांगितली. बरे नसल्याने त्याने औषधी घेतली. ‘‘आता झोपतो, मला चारच्या आधी उठवा’’ असे सांगून तो घरातील एका खोलीत गेला. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

चिठ्ठीत काय म्हटले...
‘‘मम्मी- पप्पा क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले; पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिले. बी. एस्सी. होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून की काय ?’’ चिठ्ठीतून अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

शिराढोण (बातमीदार) -  विषारी औषध घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय १९) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) रात्री उशिरा मृत्यू झाला. मराठा समाजासाठी आरक्षण नाही, शैक्षणिक सवलती नाहीत, नोकरी मिळत नाही, कर्ज आदींमुळे तृष्णा सतत चिंताग्रस्त होती. यासंदर्भात समजूत काढूनही तिने २९ जुलैला दुपारी विष घेतले, असा जबाब तिचे वडील तानाजी माने यांनी पोलिसांना दिला.

तृष्णा माने ही उस्मानाबाद येथील व्ही. जे. शिंदे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. २९ जुलैला तिने विष घेतले. तिला उस्मानाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान काल रात्री तिचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह देवळाली येथे आणण्यात आला. नातेवाईक, ग्रामस्थांनी कळंबचे तहसीलदार अशोक  नांदगावकर यांना आज दिलेल्या निवेदनाचा आशय असा - तृष्णाचे वडील शेतकरी असून सततच्या नापिकीने ते त्रस्त आहेत. त्यांच्यावर कर्ज आहे. शिक्षण, लग्नाचा खर्च वडिलांना पेलवणार नाही.

गुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, पिकाला हमीभाव मिळत नाही आदी समस्यांमुळे आलेल्या नैराश्‍येतून तृष्णाने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, माहिती मिळताच तहसीलदार नांदगावकर, नायब तहसीलदार अस्लम जमादार, शिराढोणचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, मंडळ अधिकारी अनिल अहिरे, तलाठी पी. एस. पारखे, पोलिसपाटील संदीप पाटील देवळाली येथे दाखल झाले.

उस्मानाबाद येथून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली.

मूक मोर्चात होता सहभाग
मराठा समाजाच्या प्रश्‍नांसाठी २६ ऑगस्ट २०१६ रोजी काढलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चात तृष्णाने सहभाग घेतलेला होता. आज दुपारी एकच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com