सासरच्यांनी मारहाण केल्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - रेल्वेसमोर उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शिवाजीनगर येथील रेल्वे गेट क्रमांक 55 येथे गुरुवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनास्थळी ओळखपत्राच्या झेरॉक्‍स कागदावर तरुणाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. 

औरंगाबाद - रेल्वेसमोर उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शिवाजीनगर येथील रेल्वे गेट क्रमांक 55 येथे गुरुवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनास्थळी ओळखपत्राच्या झेरॉक्‍स कागदावर तरुणाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. 

रमेश सूर्यभान शेळके (वय 35, रा. मयूरबन कॉलनी, मूळ रा. चकलांबा, गेवराई, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने पूर्णा-नगरसोल रेल्वेसमोर सकाळी सव्वासातच्या सुमारास उडी घेतली. हा प्रकार सकाळी फिरायला आलेल्या काही नागरिकांना दिसला. त्यांनी ही बाब जवाहरनगर पोलिसांना कळवली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत रमेश शेळके यांना घाटीत दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. तत्पूर्वी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्या वेळी रमेश शेळके यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणात रमेश शेळके यांचे वडील सूर्यभान शेळके यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. रमेशची पत्नी सीता नांदायला येत नसल्याने तो हताश होता. गाव सोडून तो मुलगा सचिन, मुलगी रजनी व भारतीसह औरंगाबादेत पत्नीकडे काही दिवसांपूर्वी राहायला आला; परंतु तेथे सासरच्या मंडळींनी त्याला मारहाण केली. पत्नी सीता व तिचे नातेवाईक त्याच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे तक्रारीत सूर्यभान शेळके यांनी नमूद केले. त्यानुसार, या प्रकरणात रमेश शेळके यांची पत्नी, सासरा, भावासह चौघांविरुद्ध जवाहरनगर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. 

नावांचा उल्लेख, स्वाक्षरी 

आत्महत्येनंतर कुटुंबीयांना ओळखण्यास तसदी नसावी म्हणून तरुणाने मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्‍स कागदावरच चिठ्ठी लिहिली. रमेश सूर्यभान शेळके असा उल्लेख व स्वाक्षरी आहे. 

सासरच्यांमुळे जीव देतोय.. 

पत्नी, तिचा भाऊ, सासरा यांची नावे त्याने चिठ्ठीत लिहिली आहेत. त्यांचे मोबाइल क्रमांकही नमूद असून त्यांनी मारहाण केल्याने रेल्वेखाली जीव देण्यास आलो. त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख चिठ्ठीत आहे, असे जवाहरनगर पोलिसांनी सांगितले.