'शिवसेनेची स्थिती गुळाला लागलेल्या मुंगळ्यासारखी '

'शिवसेनेची स्थिती गुळाला लागलेल्या मुंगळ्यासारखी '

बीड - सरकारमध्ये राहून एकमेकांच्या विरोधात टीका करणे आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप-शिवसेना करीत आहे. सरकारचे धोरण ठरत असताना मान खाली घालून संमती द्यायची आणि सभागृहाबाहेर टीका करायची, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेची स्थिती गुळाला लागलेल्या मुंगळ्यासारखी असून ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी (ता. 7) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या श्री. तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

कॉंग्रेसचे काही नेते दुटप्पी भूमिका घेत असून अनेक ठिकाणी शिवसेनेबरोबर युती केल्याचा आरोपही श्री. तटकरे यांनी केला. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीचा निकाल हा भाजपची वर्चस्व मोडीत काढणारा असून सरकार विरोधी कौल देणारा असल्याचे मत त्यांनी नोंदवले. विधिमंडळातील राष्ट्रवादीचे उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, युवानेते अक्षय मुंदडा, शेख शफिक, उमेदवार नारायण शिंदे या वेळी उपस्थित होते. 

श्री. तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष भाजपची बी टीम असल्याची टीका कॉंग्रेसचे काही नेते करतात; मात्र त्यांनीच अनेक ठिकाणी शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. काही ठिकाणी बॅनरवर उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे फोटो आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मराठवाड्यात हिंगोली, लातूर, जालना या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस एकत्रित निवडणूक लढवीत आहे तर बीड जिल्ह्यात बीड तालुका व परळीमध्ये आघाडी आहे. विधान परिषद शिक्षक व पदवीधर निवडणुकीतही आघाडी असल्याने यश मिळाले. 

शिवसेना-भाजप यांचे महाभारत नेहमीच घडत आहे, सरकारमध्ये राहून एकमेकांवर चिखलफेक करीत जनतेची दिशाभूल केली जात आहे. सत्तेत दोन्ही पक्ष असताना एकसंध राहण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने सरकारवर सर्वसामान्यांचा विश्‍वास राहिला नसल्याचे श्री. तटकरे म्हणाले. सुरवातीला आम्ही स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला होता; मात्र आता राष्ट्रवादीच सभागृहात आणि सभागृहाबाहेर प्रमुख विरोधक असून त्यांना पाठिंबा दिला जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

मन परिवर्तनाची वाट पाहिली 
बीड पालिका निवडणुकीत पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईबाबत विचारले असता, आम्ही त्यांच्या मनपरिवर्तनाची वाट पाहिली; पण आता या निवडणुकीनंतर बंडखोरांवर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे, तटकरे म्हणाले. 

पद्मविभूषण त्यांच्या कर्तत्वामुळे 
शरद पवारांनी पन्नास वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत एकदाही पराभव पाहिला नाही. कृषी, नैसर्गिक आपत्ती, मुंबई बॉंब हल्ल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी केलेले काम, विविध क्षेत्रांशी असलेला व्यासंग यामुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्याचा भाजपला पाठिंबा किंवा जवळीक असा काहीही संबंध नसल्याचे सुनील तटकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com