खरीप पेरणीनंतर धसांचा भाजप प्रवेश मुहूर्त

खरीप पेरणीनंतर धसांचा भाजप प्रवेश मुहूर्त

बीड - जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीलाच धोबीपछाड देणारे माजी मंत्री सुरेश धस भाजपमध्येच जाणार आहेत. पण, त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त खरीप पेरण्यानंतरचा असेल, अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबईऐवजी लोकांमध्ये आष्टीत प्रवेश आणि मागच्या दारावाटे (विधान परिषदेत) विधिमंडळात प्रवेश करणार नाही, या घोषणांमुळे हा मुहूर्त निघत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सुरेश धसांनी ऐनवेळी भाजपला मदत केल्याने राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर भाजपच्या वाटेवर असणाऱ्या धसांना राष्ट्रवादीने निलंबित केले. दरम्यान, धसांनी मतदारसंघात दौरा करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेत ‘आपण मुंबईत नाही तर आष्टीत लोकांमध्ये प्रवेश करणार’ असे जाहीर केले. मात्र, अर्धा मे महिना संपत आला तरी प्रवेश होत नसल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. जिल्हा परिषदेत भाजपला विनाअट मदत करतानाच त्यांनी पंकजा मुंडेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रवेशाचा शब्द घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण, सध्या कुठलाही राजकीय हंगाम (निवडणुका) नसल्याने अशा वेळी प्रवेश उचित नसल्याची जाण ‘राजकीय व्यवहारी’ असलेल्या धसांना असणाच. त्यातच लग्नसराईचा हंगाम, उन्हाळा असल्याने गर्दी जमवण्याची कसरत, ‘जीएसटी’च्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांची सुरू असलेली तयारी आणि पंकजा मुंडेंचा परदेश दौरा आदी कारणेही प्रवेश सोहळा लांबण्यामागे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवेशाचा मुहूर्त खरीप पेरण्यानंतरचा असेल. सध्याही धस मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री मुंडेंच्या नियमित संपर्कात असून त्या दोघांच्या मर्जीनेच मुहूर्तावर शिक्कामोर्तब होईल. तोपर्यंत राष्ट्रपतीपदाची निवडणूकही झालेली असेल व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले असतील. 

सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस आणि भाजप- शिवसेना या पक्षांची ताकद जवळपास सारखीच आहे. दरम्यान, सुरेश धसांकडे काही हक्काच्या मतांचा गठ्ठा आहे. नगरपंचायत सदस्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट झाली तर आष्टी, शिरुर व पाटोदा या तीन नगर पंचायतींसह त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य व केज व अंबाजोगाईतील राष्ट्रवादीचीही काही मते ते भाजपच्या पारड्यात टाकू शकतात. 

त्यामुळे भाजपलाही त्यांची गरज आहेच. तर, मागच्या दारावाटे  (विधान परिषदेवर नियुक्त किंवा आमदारांतून निवडून) जाणार नाही ही घोषणा पूर्ण करण्यासाठीही कदाचित धसांना हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा राजमार्ग सापडू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

तरीही दोघांनाही गरज
झेडपीसाठी निवडी झाल्याने व राष्ट्रवादीने निलंबित केल्याने भाजपपेक्षा धसांनाच प्रवेशाची गरज आहे. त्यामुळे भाजपच वेळकाढूपणा करत असल्याची चर्चा आहे. मात्र, लातूर-बीड-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद आहे. तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी मंत्री दिलीपराव देशमुखांनी यावेळी थांबण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या आशा दुणावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com