महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलंबित 

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलंबित 

बीड - गत वर्षभरात महावितरणची थकबाकी वसूल करण्याऐवजी थकबाकीची रक्कम वाढतच गेली. संपर्कासाठी दिलेला मोबाईल कायम बंद ठेवला. तसेच वीज चोरी प्रकरणातील ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनांकडे काणाडोळा करीत कार्यवाहीबाबत उदासीनता दाखविल्यामुळे गेवराई उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड यांच्यावर निलंबनाची कारवाई महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांनी केली आहे. दरम्यान या कारवाईमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.

महावितरणच्या गेवराई उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड 27 जून 2016 पासून गेवराईत कार्यरत आहेत. त्यांना कार्यालयीन कामकाज व संपर्कासाठी दिलेला मोबाईल ते कायम बंद ठेवत होते. वारंवार सांगूनही त्यांच्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. याशिवाय मार्च 2016 च्या तुलनेत जानेवारी 2017 अखेर थकबाकीमध्ये 7 कोटींवर वाढ झाली. थकबाकी वसुलीमध्ये सुधारणा झाली नाही. यामुळे कंपनीचा महसूल ठप्प झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय रजा कालावधीनंतर निर्धारित वेळेत कामावर ते हजर झाले नाहीत. कार्यालयीन वेळेत कार्यक्षेत्रात हजर राहणे गरजेचे असतानाही ते हजर राहत नसल्याने ग्राहक समस्यांसाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत. तसेच ग्राहकांच्या रोषाला सातत्याने वरिष्ठांना सामोरे जावे लागत असे. शिवाय 50 हजारांपेक्षा जास्त थकबाकीदार घरगुती ग्राहकांच्या व दहा हजारांपेक्षा जास्त थकबाकीच्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून थकबाकी वसुली प्रकरणी नियमानुसार कार्यवाही न झाल्याने व तसा अहवालही सादर केला गेला नाही, असेही महावितरणने म्हटले आहे. 

उपविभागातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजना ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत मुख्य अभियंत्यांच्या बैठकीदरम्यान सूचना दिलेली असतानाही कोणतीही कारवाई केली गेली नाही. वीज चोरी प्रकरणातील ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना असतानाही कोणतीही कारवाई केली गेली नाही. एकूणच महावितरणच्या दैनंदिन कामकाजाबाबत कायम उदासीनता दाखविल्याने व मनमानी कारभार करीत असल्याने महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांनी गेवराईचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड यांचे शुक्रवारी (ता.दहा) निलंबन केले आहे. निलंबन कालावधीत आठवड्यातील तीन दिवस लातूर येथील महावितरण कार्यालयात हजेरी देण्याचे आदेशही निलंबन ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहेत. 

सहायक लेखापालावरही कार्यवाही 
पाटोदा उपविभागाची सरासरी बिलिंगची टक्केवारी कमी करण्याबाबत मुख्य अभियंता लातूर परिमंडल यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकांमध्ये निर्देश देऊनही घरगुती ग्राहकांची ऑक्‍टोबर 2016 मध्ये असलेली नॉर्मल बिलिंगमध्ये घट झाल्याने महसूल कमी झाला आहे. सहायक लेखापाल म्हणून दरमहा व नॉर्मल बिलिंग होणे व वाढीव बिलिंगवर नियंत्रण ठेवणे हा कर्तव्याचा भाग आहे. असे असतानाही या कामी अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा ठपका पाटोदा उपविभागातील सहायक लेखापाल अशोक गोरकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या अनियमिततेला दोषी धरीत कार्यकारी अभियंता जी. डी. घोडके यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com