पगार घ्या; पण पासबुकवर...! 

passbook
passbook

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून त्याचे सर्वसामान्यांवर चांगले-वाईट परिणाम समोर येत आहेत. शासकीय, निमशासकीय आणि खासगी नोकरवर्गालाही या निर्णयाला सामोरे जावे लागले. या निर्णयानंतर आता नोव्हेंबरचा पहिला पगार नोकरवर्गाच्या पासबुकवर जमा होईल. मात्र, हा पगार दिसण्यापुरताच ठरतो की काय? अशी दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शहरात विविध क्षेत्रांत नोकरवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नोकरवर्गाचे संपूर्ण आर्थिक नियोजन हे पगारावर अवलंबून असते. मिळालेल्या पगारातून घराचा हप्ता, घरभाडे, किराणा, दूधवाला, वृत्तपत्राचे बिल, विम्याचे हप्ते, भाजीपाला आणि हातउसने व्यवहार पगाराच्या दिवशी केले जातात. 70 टक्‍क्‍यांहून अधिक नोकरवर्गाचे वेतन थेट बॅंकांत एनईएफटीद्वारे कंपनीकडून अदा केले जाते. महिन्याच्या अखेरीस 25 तारखेपासून ते चालू महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगाराच्या तारखा ठरलेल्या असतात. यामध्ये दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. पगारानुसार प्रत्येकाचा खर्चही वेगवेगळा असतो. 

सध्या औरंगाबादमधील राष्ट्रीयीकृत, खासगी, को-ऑपरेटिव्ह आणि पतपेढ्यांत रोख पैशांचा तुटवडा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एका खातेधारकाला एका आठवड्यात 24 हजार रुपये विड्रॉवल करण्याची मुभा दिलेली आहे. मात्र, शहरात आतापर्यंत शंभर आणि दोन हजार रुपयांच्या केवळ तीनशे कोटी रुपयांच्या आसपास रोख रक्‍कम रिझर्व्ह बॅंकेकडून पाठविण्यात आली आहे. त्यामुळे कसेबसे दोन आठवडे बॅंकांनी तग धरला. मात्र, आता पगाराच्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बॅंकांची भूक भागविण्यासाठी 50 कोटी रुपयांची दैनंदिन आवश्‍यकता असते. काही बॅंकांनी यादरम्यान आपल्या दुसऱ्या जिल्ह्यांतील शाखांतून अथवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या खातेधारकांना थोडेबहुत पैसे उपलब्ध करून दिले. तरीसुद्धा आठवड्याला खातेधारकाला सरासरी दहा हजार रुपयांच्या पुढे बॅंका पैसे देऊ शकल्या नाहीत. सर्वसामान्य नागरिकांचे बहुतांश व्यवहार रोखीने होत असल्याने पगारदारांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पगारदारांना बॅंकांनी पैसे देणे अपेक्षित आहे. दुसरीकडे पाच बॅंकांच्या चेस्ट करंसीमध्ये ठणठणाट असल्याने पैसे कुठून आणायचे, हा यक्षप्रश्‍न बॅंक अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. लवकरात लवकर पैसे न आल्यास बॅंकांना अर्धवेळ काम सुरू ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

रोखीऐवजी करावा लागणार कॅशलेस व्यवहार 
औरंगाबादमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, आयडीबीआय, ऍक्‍सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि जिल्हा बॅंकेत सर्वाधिक नोकरवर्गाचे खाते आहेत. पगाराचा आठवडा असल्याने पासबुकवर पगार जमा होतील. मात्र, ते काढता येणार नाहीत. रोखीऐवजी कॅशलेस व्यवहाराची बऱ्याच ठिकाणी सुविधा नसल्याने पुढील पंधरा दिवस व्यवहार ठप्प होण्याची शक्‍यता आहे. 

500 कोटींची आवश्‍यकता 
जिल्ह्यात महत्त्वाच्या बॅंकांमार्फत व्यवहार सुरळीत होण्यासाठी दररोज 50 कोटी रुपये लागतात. सध्या भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तत्काळ 500 कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडून आल्यास व्यवहार सुरळीस होण्यास मदत होईल, अशी माहिती बेट्रोचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी दिली. 

अपुरे मनुष्यबळ 
हमाल, माथाडी कामगार, कंत्राटी, कंपनी कामगारांचे पगार डिसेंबरपासून बॅंकांमार्फत करण्याचे आदेश केंद्राकडून मिळालेले आहेत. हे पगार करावयाचे असल्यास या सर्वांचे खाते उघडण्याचे निर्देश आहेत. पगार मिळविण्यासाठी नवे खाते उघडणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे सोमवारपासून पैसे डिपॉझिट-विड्रॉवलव्यतिरिक्‍त नवे अकाउंट उघडून देण्याचे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे बॅंकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com