शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - न्याय्य मागण्यांसाठी आमखास मैदानासमोर चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या हल्ल्यात तब्बल बावीस शिक्षक जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी महिला, त्यांच्यासोबतच्या मुलांनाही झोडपून काढले. या गोंधळानंतर एका पोलिस जमादाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला. 

औरंगाबाद - न्याय्य मागण्यांसाठी आमखास मैदानासमोर चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या हल्ल्यात तब्बल बावीस शिक्षक जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी महिला, त्यांच्यासोबतच्या मुलांनाही झोडपून काढले. या गोंधळानंतर एका पोलिस जमादाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला. 

महाराष्ट्र (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे ‘अनुदान हक्क मोर्चा’ दुपारी बाराच्या सुमारास क्रांती चौकातून निघून दोनच्या सुमारास आमखास मैदानावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी आमखास मैदानासमोरील रस्त्यावरच ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना वारंवार मैदानात बसण्याची विनंती केली. मोर्चेकरी शिक्षकांची रस्त्यावर सुमारे साडेतीन-चार तास घोषणाबाजी सुरू होती. सुरवातीला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी येऊन मोर्चाचे निवेदन घ्यावे, असा आग्रह त्यांनी धरला; मात्र पोलिसांनी असे करता येणार नाही, तुमच्या शिष्टमंडळाची भेट करून देऊ, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर गेले. या ठिकाणीही शिक्षकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तणाव वाढत असल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी थेट लाठीहल्ल्याचे आदेश दिले. शिक्षकांवर पोलिस अक्षरश: तुटून पडले. पाच ते सहा पोलिस एका शिक्षकावर लाठीहल्ला करीत होते. मुलांसह महिलाही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावरही पोलिसांनी बेदम लाठीमार केला. यात बावीस मोर्चेकरी शिक्षक जखमी झाले. प्रत्युत्तरात मोर्चेकरी शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात नऊ पोलिस जखमी झाले. विशाल शरद बोरसे (जालना, पीडीएस) हे कर्मचारी जखमी झाले. 

जखमी शिक्षकांची नावे अशी
खंडेराव जगदाळे (रा. कोल्हापूर), के. पी. पाटील (जालना), समाधान कोल्हे (नाशिक), नवनाथ मंत्री (परळी, ह.मु. औरंगाबाद), छाया पाटील (औरंगाबाद), गजानन ढोले, भागवत सावंत (वडवणी, जि. बीड), कन्हैया विसपुते (बजाजनगर, औरंगाबाद), यादव शेळके (वाशी, मुंबई), गजानन गायकवाड (वाशीम), उषा कदम (केज), अनिता चव्हाण (केज) आदींचा जखमींत समावेश आहे. यातील समाधान कोल्हेंसह तीनजण गंभीर जखमी आहेत.

दहा मिनिटे कॅमेरे बंद करा
दहा मिनिटे कॅमेरे बंद करा, आम्ही यांचा मोर्चा दडपूनच टाकतो, असे पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते; परंतु प्रसारमाध्यमांनी त्यांची सूचना धुडकावत कव्हरेज केले. मोर्चेकऱ्यांना बेदम मारहाण झाल्यानंतर वेळीच प्रसंगावधानामुळे काही माध्यम प्रतिनिधीही लाठीहल्ल्यातून बचावले.

आयुक्‍तांनीही सोडले नाही
हिंसक परिस्थितीला पोलिस जबाबदार असून, त्यांना परिस्थिती हाताळता आली नाही. पोलिस आयुक्तांनीही मोर्चेकऱ्यांना लाठीने बेदम मारहाण केली. पोलिस आयुक्तांसह पोलिस दलावर शहरातील नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त झाला आहे.

मास्क कॅज्युअलिटीमुळे ‘घाटी’त धावपळ 
आमखास मैदानावर शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज झाल्याचे कळताच घाटी प्रशासन सज्ज झाले. अपघात विभागातील सायरन वाजविण्यास सांगून मास्क कॅज्युलिटी असल्याच्या सूचना दिल्या. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. सुहास जेवळीकर, उपवैद्यकीय अधीक्षक सुधीर चौधरी, सर्जरीच्या विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. मंगला बोरकर, कर्मचारी अश्‍विन कुचलकुंटे, नजीम बेग, नवाब सय्यद, माहेश्‍वरी ऐटवार, सुहासिनी विंगेत, तुषार कडू, महेबूब पठाण, रमेश अवचरमल, नागनाथ इरले, बालाजी पडगीर आदी जखमींच्या उपचारासाठी झटत होते. 

आमदारांना सुनावले
जखमी शिक्षकांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड मोठ्या संख्येने शिक्षक जमा झाले होते. या जखमींना पाहण्यासाठी आमदार विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. त्या वेळी संतप्त झालेल्या शिक्षकांनी दोन्ही आमदारांना चांगलेच सुनावले. पंधरा वर्षे तुमची सत्ता होती, त्या वेळी कधी कळवळा आला नाही. आता तुम्ही येऊही नका, असे ठणकाविल्याने दोन्ही आमदार रुग्णालयाच्या बाहेर आले. तोपर्यंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार घाटी रुग्णालयात पोहोचले होते. दोन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. मोर्चेकरी शिक्षक संतप्त झालेले असल्याने पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळावी, अशी सूचना करून दोन्ही आमदार निघून गेले.

हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू
पोलिसांनी सव्वाचारच्या सुमारास मोर्चेकरी शिक्षकांवर लाठीहल्ला केला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे लाठीहल्ला सुरूच होता. या हल्ल्यानंतर जमादार राहुल प्रकाश कांबळे (लोहमार्ग, बोरिवली पोलिस ठाणे, मुंबई) यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 
 

बावीस शिक्षक, नऊ पोलिस जखमी
पोलिस जमादाराचा हृदयविकाराने मृत्यू
तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर

Web Title: teacher rally beating by police