शिक्षकांनो, उमेदवाराचा फोटो पाहा अन्‌ मतदान करा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नवा अध्याय; नोटालाही देता येणार पसंती क्रमांक

 

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नवा अध्याय; नोटालाही देता येणार पसंती क्रमांक

 

लातूर - निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंदा नवा अध्याय सुरू केला आहे. या निवडणुकीत शिक्षक मतदारांना पहिल्यांदाच मतपत्रिकेवर निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांचे फोटो पाहायला मिळणार आहेत. हा फोटो पाहून शिक्षकांना संबंधित उमेदवाराला मतदान करता येणार असून, मतपत्रिकेवरील "नोटा'ला (वरीलपैकी कोणीही नाही) पसंती क्रमांक देता येईल.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी याला दुजोरा दिला. आयोगाच्या वतीने प्रत्येक निवडणुकीत नवे प्रयोग करण्यात येत आहेत. यातून मतदारांना मतदानासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. छायाचित्रासह मतदारयादी तयार करताना मागील काही निवडणुकांपासून मतदारांना पोलचीट वाटप करण्यासाठी आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्यापुढे जाऊन मतदारांना मतदान करतेवेळी उमेदवाराची ओळख स्पष्ट व्हावी, यासाठी मत्रपत्रिकेवरच उमेदवारांचा फोटो छापण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आयोगाने शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपासून सुरू केली आहे. मतदारसंघात पसंतिक्रम देऊन मतदानाची पद्धत असल्याने निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागते. यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो छापण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. मतपत्रिकेवर "नोटा'चाही पर्याय असून मतदारांना त्यालाही पसंतिक्रम देता येणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पुरवणी व वगळणीसह नव्याने समाविष्ट करून शनिवारी (ता. सात) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दहा हजार 189 मतदार असून, वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या 216 असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली. मतदारसंघात 51 केंद्रांवर मतदान घेण्याचे प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले.

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिताही लागू झाली आहे. या निवडणुकीत तीन फेब्रुवारीला मतदान होणार असून, या काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात ग्रामीण भागात गटविकास अधिकारी, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, तर महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले.

मराठवाडा

नांदेड : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. तसेच...

07.00 PM

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

03.51 PM

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

03.24 PM