चोरट्यांच्‍या मारहाणीत एकाचा मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

फुलंब्री - फुलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड शिवारात बैल चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी शेत राखण करणाऱ्या दोघा भावांना केलेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २७) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. समाधान रंगनाथ पवार (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. यात जखमी झालेल्या अजिनाथ रंगनाथ पवार (वय २२) याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंगरगाव कवाड परिसरात रंगनाथ फकिरबा पवार यांची शेतजमीन आहे. त्यांनी या शेतातही घराचे बांधकाम केले आहे. त्यांच्याकडे शेतात मोठा गोठा असून बैल व गाई आहेत. रात्री दोघे भाऊ शेत व जनावरांची राखणदारी करीत होते. शनिवारी (ता.२६) रात्रीही शेतातील घराच्या छतावर दोघे भाऊ झोपलेले होते. रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कोणी तरी बैल सोडत असल्याची चाहूल या दोघा भावांना लागली. शेतात कोणीतरी राखण करीत असल्याचे चोरांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ छतावर जाऊन दोघा भावांना दगडाने मारहाण केली. या मारहाणीत दोघा भावांनी आरडाओरड केल्याने परिसरातील काही लोक धावून आले; मात्र तोपर्यंत समाधान रंगनाथ पवार याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. परिसरातील नागरिक येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. गावकऱ्यांच्या व पोलिसांच्या मदतीने दोघांनाही औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारादरम्यान समाधान रंगनाथ पवार याचा मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ अजिनाथ पवार यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

श्वानाला माग काढता येईना
या घटनेनंतर फुलंब्री पोलिसांनी श्वानपथकाला बोलाविले; परंतु श्वान येथील घराच्या परिसरातच घुटमळल्याने श्वानालाही माग काढता आला नाही.

चोरट्यांनी मारहाण केलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. चोरांच्या बोटांचे ठसेही घेण्यात आले आहेत. या प्रकरणात वापरण्यात आलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करून दोषींना लवकरच गजाआड केले जाईल.
- बापूसाहेब महाजन, पोलिस निरीक्षक, फुलंब्री पोलिस ठाणे.

Web Title: theft crime beating death