नरसापूर एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

रेल्वे थांबताच डब्यात प्रवेश करून चोरट्यांनी प्रवाशांना धाक दाखवून लुटले व ते तेथून पसार झाले. त्यानंतर या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांसह परभणी येथील कंट्रोल रूमला देण्यात आली. कंट्रोल रूमने मानवत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते

परभणी - पेडगाव ते देवळगाव अचावर रेल्वेस्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड करीत नरसापूर-नगरसोल रेल्वेगाडी थांबवून काही चोरट्यांनी रेल्वेतील प्रवाशांना लुटल्याची घटना रविवारी (ता. 14) पहाटेच्या सुमारास घडली.

नरसापूर-नगरसोल ही एक्‍स्प्रेस रविवारी (ता. 14) पहाटे पावणेचारच्या सुमारास परभणीहून पुढील प्रवासासाठी निघाली होती. या एक्‍स्प्रेस गाडीला परभणीनंतर जालना येथेच थांबा आहे; मात्र चोरट्यांनी सकाळी पावणेचारच्या सुमारास पेडगाव ते देवळगाव अवचारदरम्यान लोहमार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड करीत ही एक्‍स्प्रेस रेल्वे थांबविली. रेल्वे थांबताच डब्यात प्रवेश करून चोरट्यांनी प्रवाशांना धाक दाखवून लुटले व ते तेथून पसार झाले. त्यानंतर या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांसह परभणी येथील कंट्रोल रूमला देण्यात आली. कंट्रोल रूमने मानवत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

त्यानंतर लगेच बिघाड दुरुस्त करण्यात आला. या घटनेमुळे देवळगाव अवचार रेल्वेस्थानकात दिवसभर पोलिसांचा पहारा होता. सकाळपासून ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर घटनास्थळी सहकाऱ्यांसह होते. दरम्यान, जालन्यात रेल्वे थांबल्यानंतर तेथील पोलिसांतही प्रवाशांनी तक्रार दाखल केली. या घटनेत नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांत मोठी दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.