आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा दणका 

माधव इतबारे 
बुधवार, 18 एप्रिल 2018

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

औरंगाबाद - अपंगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 18) महापालिकेत घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

महापालिका मुख्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मात्र यावेळी एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांना साडेबारा वाजेपर्यंत ताटकळावे लागले. महापौरांचे आगमन होताच बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी अपंगांचा राखीव निधी वाटप करावा, अपंगांच्या नोंदी घ्याव्यात, महापालिकेचे व्यावसायिक गाळे अपंगांना द्यावेत, घरकुल योजनांचा लाभ द्यावा, पार्किंग अपंगांना मोफत करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. 

आयुक्त नाहीत त्यांचे नशीब - 
यावेळी बच्चू कडू म्हणाले, अपंगांवर आंदोलन करण्याची वेळ आली ही बाब निंदणीच आहे. येत्या पंधरा दिवसात मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर काय परिणाम होईल ते प्रशासनाने बघावे. आयुक्त नाहीत, त्यांचे नशीब. अन्यथा आणखी एक गुन्हा दाखल झाला असता. उपायुक्तांना खुर्चीसहित उचलून फेकू असा इशाराही त्यांनी दिला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There was a movement under the leadership of MLA Bachu Kadu