जिल्ह्यात तीस हजार मतदारांची वाढ 

जिल्ह्यात तीस हजार मतदारांची वाढ 

लातूर - निवडणूक आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या मतदारयादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात तीस हजार 208 मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारांना येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. वाढलेल्या मतदारांसह जिल्ह्यातील मतदारांची संख्या 17 लाख 56 हजार 789 वरून 17 लाख 86 हजार 995 झाली आहे. 

आयोगाच्या वतीने वाढीव मतदारांसह गुरुवारी (ता. पाच) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या वतीने नवीन मतदारांची नोंदणी, तसेच मृत, दुबार व स्थलांतर झालेल्या मतदारांची वगळणी आणि मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी 16 सप्टेंबर ते 21 ऑक्‍टोबर या काळात पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. 

एक जानेवारी 2017 रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली. याला युवक व युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. यातूनच जिल्ह्यात तीस हजार 208 नवीन मतदारांची वाढ झाली आहे. सर्वाधिक आठ हजार 444 मतदार लातूर शहर विधानसभा मतदारसंघात, तर त्याखालोखाल सहा हजार 18 मतदार अहमदपूर विधानसभा मतदारसंघात वाढले आहेत. यादीतील दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदारांची वगळणी या कार्यक्रमात करण्यात आली. यातूनच जिल्ह्यात सहा हजार 841 मतदारांची नावे यादीतून वगळल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले. यात सर्वाधिक दोन हजार 412 मतदारांची वगळणी लातूर ग्रामीण, तर त्यानंतर दोन हजार 188 मतदारांची वगळणी लातूर शहर मतदारसंघात करण्यात आली आहे. यादीत वाढलेल्या मतदारांत 15 हजार 640 पुरुष, तर 14 हजार 568 महिला मतदारांचा समावेश आहे. या नवीन मतदारांना येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. अंतिम याद्या सर्व मतदान केंद्रासह तहसील, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपले यादीतील नाव तपासून घ्यावे, तसेच यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी त्यांचे छायाचित्र मतदान केंद्रावरील बीएलओंकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com