बीड जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

बीड - बीड जिल्ह्यात रविवारी (ता.२७) वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात बीड तालुक्‍यात एक, तर केज तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यात वृध्द शेतकऱ्याने काल विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्या केली.

बीड - बीड जिल्ह्यात रविवारी (ता.२७) वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात बीड तालुक्‍यात एक, तर केज तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यात वृध्द शेतकऱ्याने काल विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्या केली.

ज्ञानोबा अर्जुन दोडके (वय ४५ रा. नांदूरघाट, ता. केज) यांची दोन एकर कोरडवाहू शेती असून बॅंकांचे कर्ज आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलीचा विवाह झाला. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीचे वाचन झाले होते. त्यात त्यांचे नाव नव्हते. कर्जामुळे ते नैराश्‍येत होते. त्यातून सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कोरगाव (ता. केज) येथील शेतकरी मेघराज रामभाऊ घुले (५२) यांनी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते. त्यातच ऊसतोडणीसाठी उचल म्हणून घेतलेले पैसेही फिटले नाहीत. नैराश्‍येतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. 

नापिकी, कर्जाला कंटाळून वासनवाडी (ता. बीड) येथील शेतकरी चंद्रकांत वामन दळवी (४५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

वृद्धाची विहिरीत उडी
सोनपेठ (जि. परभणी) - उखळी तांडा (ता. सोनपेठ) येथील शेतकरी नामदेव तुकाराम राठोड (६५) यांनी शनिवारी (ता.२७) दुपारी तीनच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नापिकी, कर्जामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मागे दोन विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: three farmer suicide in beed district