नोटाबंदीचा विक्रीकराला बसणार तीनशे कोटी रुपयांचा फटका 

नोटाबंदीचा विक्रीकराला बसणार तीनशे कोटी रुपयांचा फटका 

औरंगाबाद - नोटाबंदीने सर्वसामान्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच होरपळले. नोटाबंदीने काळा पैसा उजेडात येणार म्हणून या घोषणेचे सर्वसामान्यांनी स्वागत केले. मात्र, त्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व्यवहार ठप्प झाले. शासनालादेखील फटका बसला असून, औरंगाबाद विभागात विक्रीकर वसुलीत ऑक्‍टोबर 2016 पासून घट होण्यास सुरवात झाली आहे. ती आताही कायम आहे. विक्रीकर वसुलीत सुमारे तीनशे कोटींची तूट येण्याची शक्‍यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये ऑटोमोबाईल, लिकर, स्टील आणि ठोक-किरकोळ व्यापारातून सर्वाधिक विक्रीकराची वसुली होते. दरवर्षी साधारणत: तीन हजार कोटी रुपयांच्या घरात विक्रीकर वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. यंदा मार्च एंडपर्यंत 2890 कोटी 80 लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट विक्रीकर विभागासमोर आहे. आतापर्यंत यापैकी केवळ 2160 कोटी रुपयांचा विक्रीकर जमा झाला. यंदा चांगला पाऊस, पीकपाणी आणि उद्योग-व्यवसायाच्या धोरणामुळे विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये चांगली उलाढाल होऊन उद्दिष्ट पार करण्याची अपेक्षा विभागाला होती. मात्र, दिवाळीनंतर अचानक झालेल्या नोटाबंदीने सगळे चित्रच पालटले. इतकेच नव्हे, तर गेल्यावर्षी गाठलेले उद्दिष्टही ऑक्‍टोबरपासून गाठता आलेले नाही. 

नोटाबंदी झाल्यानंतर पहिल्या महिन्यात उद्योग-व्यवसायांना फारशी अडचण जाणवली नाही. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2017 मध्ये काही कारखान्यांनी दोन ते तीन शिफ्टमध्ये सुरू असलेले उत्पादन एकाच शिफ्टमध्ये केले. यात प्रामुख्याने ऑटोमोबाईल उद्योगाचा समावेश होतो. औरंगाबादमध्ये बड्या कंपन्यांव्यतिरिक्‍त चारशे व्हेंडर्स आहेत. त्याशिवाय बाजारात नागरिकांनी हातचा राखूनच पैसा खर्च केला. त्यामुळे नोटाबंदीपासून विक्रीकर वसुलीत घट होत आहे. यंदा 2890 कोटी 80 लाख रुपयांपैकी 2600 कोटी विक्रीकर वसूल होऊ शकतो, असा अंदाज विक्रीकर विभागाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. 

जीएसटीनंतरही थकीत वसुली कायम 
एक जुलैला जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांनी तयारी केली आहे. मात्र, त्यानंतरसुद्धा विक्रीकराअंतर्गत येणारे व्हॅट, ऊस खरेदी कर, ऐषाराम कर, व्यवसाय आणि प्रवेश कराची वसुली कायम सुरू राहील. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक काम करणार आहे. त्यामुळे थकीत करातून कोणत्याही परिस्थितीत सुटका होणार नाही, असे संकेत विक्रीकर अधिकाऱ्यांनी दिले. 

जीएसटी नोंदणी युद्धपातळीवर सुरू 
विभागीय विक्रीकर कार्यालयाअंतर्गत एकूण 31 हजार 588 व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. एक एप्रिल 2016 पासून सर्व कर एकत्रित करून जीएसटी एकच दर राहण्याची शक्‍यता आहे. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांच्या नावनोंदणी अभियानाला 14 नोव्हेंबरपासून धडाक्‍यात सुरवात झाली. आतापर्यंत औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये एकूण 25,589 व्यापाऱ्यांनी नोंदणी केली. 31 मार्चपर्यंत जीएसटी नोंदणी सुरू राहणार आहे. 

महिना.... 2015-16 (झालेली वसुली) .... 2016-17 (झालेली वसुली, कंसात उद्दिष्ट) 
ऑक्‍टोबर.... 247 कोटी.... 244.34 कोटी (284 कोटी) 
नोव्हेंबर.... 210 कोटी.... 214.31 कोटी (243.98 कोटी) 
डिसेंबर.... 185 कोटी.... 174.47 कोटी (216 कोटी) 
जानेवारी.... 224 कोटी.... 218 कोटी (258 कोटी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com