‘ई-बे’ला घातली ‘तिकीट युटिल्स’ने मोहिनी

‘ई-बे’ला घातली ‘तिकीट युटिल्स’ने मोहिनी

औरंगाबादच्या ‘तिकीट युटिल्स’ या आयटी कंपनीने ई-तिकीट क्षेत्रात जगभर दबदबा निर्माण केला आहे. जगविख्यात अमेरिकन कंपनी ‘ई-बे’ला देखील ‘तिकीट युटिल्स’ने मोहिनी घातली आहे. तिकीट युटिल्सच्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या अफाट लोकप्रियतेची दखल घेत चार महिन्यांपूर्वी अख्खी कंपनीच ‘ई-बे’ने विकत घेतली आहे; तसेच इथे काम करणारे तरुण-तरुणी मराठवाड्यातील आहेत, हे विशेष.

अमेरिकेत बेसबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, आईस हॉकी या खेळांचे प्रचंड वेड आहे. तिथे ‘सिझन तिकीट’ असा प्रकार आहे. एखाद्या संघाच्या चाहत्याला दरवेळी त्याच सीटवर; त्याच रांगेत बसून सगळे सामने बघायचे असल्यास अख्ख्या वर्षाची साधारणत: २५-३० तिकिटे विकत घेतली जातात. तिथे जाणे शक्‍य नसल्यास, ते परत विकण्याचीही पद्धत आहे. ‘ई-बे’वर जाऊन लोक तिकीट विकायची. तिथे एका तिकिटाची माहिती टाकायला पाच ते दहा मिनिटे लागायची. त्यासाठी एकाचे दोन तास वाया जायचे. हे लक्षात आल्यानंतर मुक्‍तक जोशी यांनी सहकाऱ्याच्या मदतीने मोजक्‍याच माहितीसह तिकीट ‘ई- बे’ला पोस्ट करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवायचे काम हाती घेतले. हीच तिकीट युटिल्स कंपनीची सुरवात ठरली.

रॉकेट पोस्ट, तिकीट पॉईंट ऑफ सेल, डबल सेल प्रोटेक्‍शन, सिटींग चॅर्ट, इन्स्टंट ऑनलाईन स्टोअर, ब्रोकर हब असे २०१० नंतर एकापाठोपाठ एक सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आले. ऑनलाईन तिकीट विक्री क्षेत्रात तिकीट युटिल्सने जगभरात धुमाकूळ घातला. बघता बघता या क्षेत्रातील जगविख्यात कंपनीची नजर त्यावर पडली. जानेवारी २०१६ मध्ये ‘ई-बे’चा भाग असलेल्या भारतातील ‘स्टब हब’कडून विचारणा झाली. कंपनी विकण्यासाठी जुलै २०१६ मध्ये करार करून सर्व शेअर्स ‘ई-बे’ला विकण्यात आले; तसेच सप्टेंबर २०१६पासून ‘तिकीट युटिल्स’चे सर्वच कर्मचारी ‘ई-बे’चा भाग झाले असून, ते ‘स्टब हब’चे कर्मचारी आहेत. एप्रिल २०१७ मध्ये ‘तिकीट युटिल्स’ नाव बदलून ‘स्टब हब’ होईल. ही मराठवाड्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

‘रॉकेट पोस्ट’
ब्रोकर स्टेडियममधील सेक्‍शन विकत घेतात आणि ते परत विकतात, यात लाखोंची उलाढाल आहे. लोकांचा वेळ वाचविण्यासाठी ‘रॉकेट पोस्ट’ सॉफ्टवेअर तयार केले. २०१० ला बघता बघता साडेपाचशे क्‍लायंट आले. जे तिकीट विकायला लागले, त्यांना सिटींग चार्टही दिला. गेम कसा दिसेल, ते थ्रीडीमध्ये पाहू लागले. तिकीट विक्रीवर चांगला परिणाम झाला.

‘तिकीट पाँईंट ऑफ सेल’
लाखो तिकीट विक्रीला असल्याने जड जाऊ लागले. त्यामुळे ‘तिकीट पॉईंट ऑफ सेल’ हे सॉफ्टवेअर बनविले. कुठल्याही तिकिटाची नोंद, परत विकले की नोंद, त्यामुळे तिकीट किती शिल्लक, किंमत काय, कितीला घेतले, कितीला विकले, कोणाकडून घेतले, कोणाला विकले, पैसे आले की नाही. याची नोंद ठेवायला याचा उपयोग होऊ लागला.

‘डबल सेल प्रोटेक्‍शन’
‘ई-बे’ तिकीट मार्केट प्लेससोबत लोक १२० ठिकाणे तिकीट विकत होती. त्यातीलच स्टब हब ही एक होती. त्यामुळे पुढचा प्रोग्रॅम बनविला, ग्राहकाचे तिकीट सगळ्या मार्केट प्लेसला एकत्र पाठवू. त्यामुळे तिकीट विकण्याच्या शक्‍यता वाढल्या. एकच तिकीट दोनदा विकले जाऊ नये म्हणून डबल सेल प्रोटेक्‍शन सॉफ्टवेअर बनविले. यामुळे तिकीट दोनदा विकले जाणे कमी झाले.

‘सिटींग चार्ट’
सिटींग चार्ट प्रॉडक्‍टसाठी एक पेटंट दाखल केले आहे. हा टूल इतका लोकप्रिय झाला, की जगातील नंबर एकचा लायसेन्सेबल सिटींग चार्ट कॅटलॉग आहे. १८ हजार २५० स्टेडियमची माहिती आहे. यात पाच हजार ७१७ ठिकाणे कव्हर केली आहेत. यासाठी १५ दिवसाला नवीन दोनशे चार्ट बनविले जातात. बऱ्याच मार्केट प्लेस हे चार्ट वापरतात.

‘इन्स्टंट ऑनलाईन स्टोअर’
एक असेही स्टोअर बनविले, की ग्राहकाला काहीही न करता नुसते माऊसने ड्रॅग ड्रॉप केले, की तुमचे स्टोअर तयार व्हायला लागले. केवळ बटण दाबून विकत घेता येईल, यासाठी इन्स्टंट ऑनलाईन स्टोअर कन्सेप्ट आणली. यात ग्राहकाला स्टोअर बनविता येऊ लागले. कलर, फोटो बदलू शकता. स्वत:ची वेबसाईट बनवून तिथेच तिकीट विकता येऊ लागली. या प्रकारची २०० स्टोअर आहेत.

‘ब्रोकर हब’
दोन तिकीट विक्रेत्यांना एकमेकांची तिकीट विकत घेता यावीत, यासाठी ब्रोकर हब सॉफ्टवेअर बनविले. तिकीट ब्रोकर टू ब्रोकर विकता येऊ लागली. आणि तेही लोकप्रिय ठरले.

औरंगाबादमधील कंपनीला जागतिक स्तरावरील कंपनीसोबत काम करायला मिळते. तिथली संस्कृती, कॉर्पोरेट लाईफ अनुभवायला मिळेल. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, परभणी, बीड आदी भागांतील ३० कर्मचारी कार्यरत आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
- मुक्‍तक जोशी, तिकीट युटिल्सचे सर्वेसर्वा (सध्या स्टब हब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com