कापसाचे उत्पादन निम्म्याने घटणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

तीर्थपुरी - उत्पादनाच्या तुलनेत शेतीचा खर्च वाढत असल्याने शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. यंदा कापसाचे उत्पादन चांगले होणार या आशेने शेतकऱ्यांनी कपाशीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यातच मागील एक ते दीड महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे दिसत आहे. 

तीर्थपुरी - उत्पादनाच्या तुलनेत शेतीचा खर्च वाढत असल्याने शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. यंदा कापसाचे उत्पादन चांगले होणार या आशेने शेतकऱ्यांनी कपाशीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यातच मागील एक ते दीड महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे दिसत आहे. 

यावर्षी जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी एकावेळी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली; परंतु जून महिन्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या लागवड केलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी कापसाची ओलिताखाली कापूस लागवड केली असल्याने यंदा कापसाचे चांगले उत्पादन होणार असल्याचे दिसत होते; परंतु मागील एक ते दीड महिन्यापासून या भागात मुसळधार पाऊस पडल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या फवारणीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला.  खर्चाच्या तुलनेत उत्पादन होणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहेत.

वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा
वातावरणातील बदलामुळे वादळी वारे व पाऊस पडत असल्याने शेतकरी सोयाबीन काढण्याची घाई करीत आहेत. तसेच सुरवातीला लागवड केलेल्या कापसाची वेचणी करण्यास सुरवात झाली असल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मजूर कापूस वेचणीसाठी सहा ते सात रुपये प्रतिकिलो दराने वेचणी करीत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 

कधी पावसाअभावी, तर कधी पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे. कपाशीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मजुराचा तुटवडा निर्माण झाल्याने सुरवातीपासून वेचणीचे दर वाढले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 
- प्रल्हाद यसलोटे, शेतकरी भायगव्हाण

खासगी कापूस खरेदी सुरू
शासकीय कापूस खरेदीच्या हालचाली दिसत नसल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यास कापूस विक्री करीत असल्याचे दिसत आहे. दिवाळीचा सण आल्याने शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्री करीत आहे. या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल चार हजार रुपये दराने कापसाची खरेदी करण्यात येत आहे. 

कापूस उत्पादनाचा खर्च वाढला
कापूस उत्पादनासाठी एकरी सरासरी १२ ते १३ हजार रुपये होत असून, यात शेतीमशागत, लागवड, औषधी व वेचणी खर्च सरासरी १२ ते तेरा हजार रुपये होत आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: tirthpuri marathwada news cotton production decrease