पाणीप्रश्‍न गाजणार! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - महापालिकेची सोमवारी (ता. १६) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, शहरातील कोलमडलेले पाण्याचे वेळापत्रक व दूषित पाण्याचा विषय सभेत गाजण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सकाळी ११.३० वाजता ही सभा होणार आहे.

औरंगाबाद - महापालिकेची सोमवारी (ता. १६) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, शहरातील कोलमडलेले पाण्याचे वेळापत्रक व दूषित पाण्याचा विषय सभेत गाजण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सकाळी ११.३० वाजता ही सभा होणार आहे.

शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या काही महिन्यांपासून कोलमडले आहे. महापालिका प्रशासन दोन दिवसांआड पाणी देण्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यात पाण्याच्या वेळादेखील पाळल्या जात नाहीत. कधी सकाळी; तर कधी रात्री पाणी येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सिडको-हडकोतील नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत आयुक्तांनी तीन दिवसांत पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आणा, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली; मात्र अद्याप वेळापत्रक पूर्वपदावर आलेले नाही. वेळापत्रक कोलमडलेले असतानाच दुसरीकडे दूषित पाण्याचा विषय समोर आला. तीन पाण्याच्या टाक्‍यांवरून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल छावणी येथील प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्‍नावरून सोमवारच्या सभेत प्रशासनाची कोंडी करण्याची तयारी नगरसेवकांनी केली आहे. 

सातारा-देवळाईत मोफत पाणी द्या 
सातारा-देवळाई भागात टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा, असा अशासकीय प्रस्ताव राजू शिंदे, अप्पासाहेब हिवाळे, गोकुळसिंग मलके यांनी ठेवला आहे. या भागात महापालिकेकडून कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत, पाण्याचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे. नागरिकांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. उन्हाळ्यात पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे बोअर आटतात, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Today's general meeting of the municipal corporation's water turbulence