झेडपी निवडणुकीची आज मतमोजणी 

झेडपी निवडणुकीची आज मतमोजणी 

बीड - जिल्ह्यातील 60 गट आणि 120 गणांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान झाले. शांततेत झालेल्या निवडणुकीत जिल्हाभरात सरासरी 70.35 टक्के इतके मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का 4 ने वाढला. निवडणुकीनंतर मतमोजणीसाठी सहा दिवसांचा अवधी असल्याने जिल्ह्यात तर्क-वितर्काला उधाण आले. "गुलाल आम्हीच उधळणार' असे दावे-प्रतिदावे सर्वच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमधून केले जात आहेत. दरम्यान जो-तो अंदाज लावत असला तरी मतमोजणीची वेळ काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांची "धडधड' वाढली आहे. 

गुरुवारी (ता. 23) त्या-त्या तालुकास्तरावर होत असलेल्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून दुपारी 2 पर्यंत निकाल जाहीर होतील असे निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या 60 गटांसाठी व पंचायत समितीच्या 120 गणांसाठी 16 फेब्रुवारीला जिल्ह्यातील 1 हजार 866 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. 60 गटांसाठी 342 उमेदवार तर 120 गणांसाठी 615 उमेदवार असे एकूण 957 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यात एकूण 15 लाख 1 हजार 151 मतदार असून त्यापैकी 10 लाख 78 हजार मतदारांनी म्हणजेच 70.35 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून त्या-त्या तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी जिल्ह्यात एकूण 176 टेबल असणार आहेत. मतमोजणीसाठी या टेबलवर एकूण 449 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय 10 टक्के राखीव कर्मचारी असतील. टपाली मतपत्रिका छाननीसाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. स्ट्रॉंग रूममधून मतदान यंत्रे काढून मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रो-ऑफिसरची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या हाताखाली वर्ग-4 चे कर्मचारी देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या आकडेवाडीची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी वेगळा कक्ष आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी, निवडणुकीचे विशिष्ट अधिकारी वगळता अन्य कोणासही भ्रमणध्वनी वापरता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 

दावे-प्रतिदावे, पैजा अन्‌ घालमेल 
गत गुरुवारी (ता.16) निवडणूक पार पडल्यावर या गुरुवारी (ता.23) मतमोजणी होत आहे. निवडणुकीनंतर मतमोजणीसाठी सहा दिवसांचा अवधी असल्याने निकालाबाबत सर्वसामान्यांमधून तर्क-वितर्क तर कार्यकर्त्यांमधून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अनेक ठिकाणी तर गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये आपसात पैजा लागल्या आहेत. कोणी विजय आमचाच होणार असे सांगत आहे तर कोणी गुलाल आम्हीच उधळणार असे म्हणत आहे. काहींनी तर गुलालासह तेरखेड (जि. उस्मानाबाद) येथील फटाका फॅक्‍टरीमधून शोभेची दारूदेखील आणून ठेवली आहे. काहींनी विजयी मिरवणुकीचे नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अन्‌ सामान्यांमध्ये उत्सुकता असली तरी बहुतांश ठिकाणी निवडणूक चुरशीची झाल्याने उमेदवारांमध्ये घालमेल असून निकाल काही तासांवर येऊन ठेपल्याने अनेकांच्या मनात धडधड वाढली आहे. 

मतमोजणीसाठी तगडा बंदोबस्त 
मतमोजणीसाठी सर्व तालुकास्तरावर तगडा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन अप्पर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 18 पोलिस निरीक्षक, 86 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 695 पोलिस कर्मचारी, 500 होमगार्ड व 100 महिला होमगार्ड तसेच एसआरपीची एक कंपनी यांचा सहभाग आहे. बीडच्या मतमोजणीसाठी 18 अधिकारी व 104 पोलिस कर्मचारी तैनात असणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com